अलीगड – उत्तर प्रदेशच्या अलीगड येथे एका कार अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. हा भीषण अपघात पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्हिडीओतून या अपघाताची भीषणता लक्षात येते. अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या चालकामुळे हा अपघात घडला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
या सीसीटीव्हीत तुम्ही पाहू शकता की, वेगाने आलेली कार दुभाजकाला धडकते आणि त्यानंतर जागेवर पलटी होते. अलीगड मुस्लीम यूनिवर्सिटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अपघाताचा व्हिडीओ कैद झाला. संध्याकाळच्या सुमारास रस्त्यांवर इतर वाहनांची वर्दळ असताना त्यात ही कार वेगाने जात असल्याचं व्हिडीओत दिसून येते. वेगात असलेल्या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटतं आणि कारला दुभाजकाला आदळली.
अपघातात कारने अनेक पलटी घेतल्यानंतर चालकाच्या बाजूवर कार तशीच राहिली. हा अपघात पाहून कारच्या चालकाचा जीव वाचला की नाही? असा विचार तुमच्या मनात आला असेल. परंतु या अपघातात कारचा चालक जखमी झाला. कारचालक एका खासगी शाळेत शिक्षक होता. अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले त्यांनी वाहन चालकाला उपचारासाठी जेएन रुग्णालयात नेले. कारमध्ये असणाऱ्या इतरांना किरकोळ जखमा झाल्या. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली.