सातारा : येथील गोडोलीतील साईबाबा मंदिराच्या पाठीमागील आवारातील स्टोअर रुम फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख ५६ हजार रुपयांच्या विविध प्रकारच्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. ही घटना दि. ३ रोजी मध्यरात्री घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोडोलीमध्ये साईबाबा मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात स्टोअर रुम असून, या स्टोअर रुमचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. या खोलीतील चांदीच्या मुकुटाचे तीन नग, गाभाऱ्यातील चांदीच्या पादुका, पालखीमधील छोट्या पादुका, पालखीमधील छोटी छत्री, चांदीची घंटी, चांदीचे तामण, चांदीची पंचारती, चांदीचा तांब्या, फूलपात्र, चांदीची प्रसादाची वाटी, चमचा, चांदीचा तोडा, मुख्य मूर्तीच्या पायाखालचे चांदीचे कव्हर, चांदीच्या निरंजनाचे तीन नग, चांदीचे डोळे, बारीक पाळणा, चांदीची साईबाबांची मूर्ती अशा प्रकारच्या वस्तू चोरट्याने लंपास केल्या. दि. ४ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर सातारा शहर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. शिवाय स्टोअर रुम परिसरात काही संशयित वस्तू सापडतायत का, याचाही शोध घेतला. परंतु पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. भर वस्तीत आणि तिही मंदिराच्या वस्तूंची चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत.
चोरट्याने चेहरा झाकला
साईबाबा मंदिराच्या चांदीच्या वस्तू चोरणारा एकच चोरटा असून, त्याने चोरी करतावेळी संपूर्ण चेहरा कापडाने झाकला होता. शिवाय त्याच्या हातात बॅटरी होती. या बॅटरीने त्याने सीसीटीव्हीवर फोकस पाडल्याने सीसीटीव्हीतील चित्र अस्पष्ट दिसत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून, यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.