सोलापूर : निमगाव (ता. अक्कलकोट) येथील भवानी मंदिरातील दानपेटी फोडून १,४३० रुपये घेऊन पसार होताना ग्रामस्थांनी पकडून एकाला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाळू शिंदे (रा.माणिक पेठ, अक्कलकोट), देवानंद पवार (रा.हन्नूर रोड, अक्कलकोट) यांना अटक केली आहे.
संशयित आरोपी रिक्षा (एम. एच. १३ / एन. ६७८६) घेऊन निमगाव येथे आले. गावातील भवानी मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील १४३० रुपये घेऊन पसार होण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान, सोहेल हरकूड यांनी कुत्रा भुंकताना उठून पाहिले असता घटना निदर्शनास आली. अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून जात होते.
तेव्हा झोपेतील ग्रामस्थ मुजामिल पिरजादे, दौलत सोडगी, मुबारक शेख, सोहेल हरकुडे यांनी आरडाओरड करीत पाठलाग करून संशयिताला पकडले. प्रकाश पाटील, शवरप्पा बिराजदार, महंमद पठाण, राहुल गायकवाड, सतीश पाटील यांनी मदत केली. तेव्हा पोलिस पाटील सुशांत बिराजदार यांनी तत्काळ पोलिस उपनिरीक्षक अजित मोरे यांना कॉल करून माहिती दिली.
रिक्षाही चोरीचीच..या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा अक्कलकोट येथून चोरीस गेली होती. मूळ मालक पोलिस ठाण्यात आला होता. गावाजवळ गेल्यानंतर रिक्षाचा आवाज येऊ नये म्हणून बंद करून चोरी केली. मात्र, कुत्रा भुंकत असल्याने ग्रामस्थ जागे झाले.