भदोही - उत्तर प्रदेशातील भदोही इथं नवविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. जौनपूरमधील मुलीचे जनपद गोपीगंज इथं शनिवारी लग्न झाले होते. रविवारी रिसेप्शन ठेवण्यात आले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून घटनेने परिसरात विविध चर्चा रंगल्या आहेत.
जौनपूर येथील मोहम्मद युनूस यांच्या २१ वर्षीय मुलगी रोशनीचा निकाह २२ वर्षीय मुख्तार अहमदसोबत झाला. १८ जूनला रात्री उशिरापर्यंत रिस्पेशन सुरू होते. नवऱ्याच्या भावाने सांगितले की, रिस्पेशनला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आम्ही सर्वांनी जेवण केले आणि त्यानंतर झोपण्याची तयारी करायला लागलो. यावेळी नवरदेव मुख्तार नवरीच्या खोलीत गेला तेव्हा तिची तब्येत बिघडली होती. स्थानिक डॉक्टरांना बोलवून तपासले असता तिला औषधे दिली. सोमवारी सकाळी तब्येत सुधारली नाही म्हणून डॉक्टरांनी हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नवरीला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
परंतु मुलीच्या कुटुंबियांनी आरोप केला की, कुठल्यातरी कारणावरून मुलीची हत्या करण्यात आली. ज्यादिवशी रिस्पेशन होते त्या रात्री मुलीची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली. परंतु या लोकांनी चुकीचे उपचार करून माझ्या बहिणीची हत्या केली. बहिणीला चांगल्या डॉक्टरांकडे दाखवा असं त्यांना म्हटलं होते. परंतु त्यांनी ऐकले नाही. या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
दरम्यान, नवरीच्या मृत्यूनंतर मुलीकडच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. सरकारी डॉक्टरांनुसार, नवरीची तब्येत ढासळली होती. तिच्या शरीरात रक्त कमी होते. कदाचित जेवणातून विषबाधा झाली असण्याची शक्यता आहे. मृतदेहाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल. सध्या पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक राजेश भारती यांनी दिली.