अमरावती : घरी पत्नी म्हणून मी असताना पती अन्य महिलांना घरी आणू लागला, ठेऊ लागला. त्यामुळे आमच्यात कौटुंबिक कलह निर्माण झाल्याची तक्रार एका प्रेमविवाह केलेल्या विवाहितेने नोंदविली आहे. याप्रकरणी, फ्रेजरपुरा पोलिसांनी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी पिडिताच्या पतीसह एका महिलेविरूध्द कौटुंबिक छळ, मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, यातील फिर्यादी महिला व आरोपी हे पती पत्नी असून त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. लग्नानंतर सुरूवातीला काही दिवस सर्व सुरळीत चालले. मात्र त्यानंतर पती हा महिलांना घरी आणू लागला. त्यांना घरी ठेऊ लागला. त्यास विरोध केला त्याने आपल्याला थापडा बुकयांनी मारहान करून शिवीगाळ केल्याचे महिलेने म्हटले आहे. आरोपी पती हा घरात आणलेल्या महिलेला काही दिवसांनी सोडून परत दुसऱ्या महिलेला घरी आणतो. विरोध केल्यास आपला शारीरीक व मानसिक छळ करत असल्याची फिर्याद तिने नोंदविली आहे.
मुलगाही हिसकावला
पतीने आपल्या मुलाला आपल्यापासून हिसकावून घेतले. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी आपण मुलाला भेटायला गेली असता पतीने त्याला भेटू दिले नाही. उलट त्याच्यासह त्याच्या सोबत असलेल्या महिलेने आपणास लाथा बुक्क्यांनी व तोंड दाबून मारहान केली. आपला मोबाईल हिसकावून आपल्याला घराबाहेर काढून दिले, अशी फिर्याद महिलेने फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली आहे. पतीचा त्रास असह्य झाल्याने घटनेच्या पाच दिवसानंतर ती पोलीस ठाण्याची पायरी चढली.