संताजी शिंदे-सोलापूर
सोलापूर : कत्तलीसाठी सोलापूरात आणण्यात येणाऱ्या २५ जनावरांची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पोतून वैरागरोड मार्गे जनावरांची वाहतूक होत आहे. जनावरे सोलापूरात कत्तलीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून कार्यकर्त्यांनी वैगार रोडवर सापळा रचला, दरम्यान एक टेम्पो (क्र.एमएच १७ टी-३५००) संशयीतरित्या जाताना आढळून आली. कार्यकर्त्यांनी टेम्पोचा पाठलाग केला, नान्नज येथे गाडी आडवण्यात आली. कार्यकर्त्यांना पाहून चालक टेम्पो सोडून पळून गेला. पाठीमागील बाजूस पडदा काढून आत पहाणी केली असता, जनावरे निर्दयीपणे कोंबल्याचे निदर्शनास आले.
कार्यकर्त्यांनी तात्काळ तालुका पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले, आतील सर्व जनावरे बाहेर काढण्यात आली. काही जनावरांना गंभीर दुखापत झाली होती. एका जनावराचा गळा कापलेल्या आवस्थेत होता. सर्व जनावरांना बार्शी रोडवरील अहिंसा गोशाळेत पाठवण्यात आले. या कारवाईला तालुका पोलिस ठाण्याचे फौजदार निंबाळकर यांचे सहकार्य लाभले. जनावरांची सुटका करण्यासाठी बजरंग दल सोलापूर जिल्हा प्रमुख प्रशांत परदेशी, सिद्राम चरकुपल्ली, पवनकुमार कोमटी, अण्णा भोसले, पवन बल्ला, कुमार आंबट, अविनाश मदनावाले, अनिकेत गोरट्याल, विशाल निलाखे, मानद पशूकल्याण प्रतिनिधी अजय हक्के, युवराज कोलाकाटी, आशिष शेगुरे आदींचे योगदान लाभले.