लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २० गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील २८ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अटक केलेल्या गुन्हेगारावर यापूर्वी देखील १४ गुन्हे दाखल आहेत.
ऐरोली, कोपर खैरणे परिसरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या तपासात गुन्हे शाखा पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. गतमहिन्यात ऐरोली सेक्टर ३ मध्ये १० लाखाची घरफोडी झाली होती. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचे पथक तपास करत होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक आर. एम. तडवी, हर्षल कदम, होल्डर रोहिदास पाटील, बालाजी चव्हाण, निलेश किंद्रे, शशिकांत जगदाळे, अजय वाघ आदींची विविध पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी मागील काही महिन्यात ऐरोली परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाण व भवतालच्या सीसीटीव्ही मार्फत गुन्हेगारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु प्रत्येक वेळी अर्ध्यावरून तपासाचा धागा सुटत होता. अखेर २६ ऑगस्टला घडलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक संशयिताची माहिती हाती लागली होती. त्यासाठी पथकाला सहाहून अधिक दिवस सीसीटीव्ही तपासण्यात घालवावे लागले होते. त्यामध्ये एका रिक्षाचालकांच्या मदतीने पोलिसांचे पथक कळवा येथे पोचले असता सराईत गुन्हेगार हाती लागला.
संतोष घनघाव (४५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो कळवा येथील अण्णाभाऊ साठे नगरचा राहणारा आहे. ऐरोली परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी केल्यानंतर ठाणे बेलापूर मार्गावरील ऐरोली येथील टी जंक्शन पासून रिक्षाने तो कळव्याला जात असे. यामुळे पुलापासून पुढे तो कुठे गेला याचा शोध पोलिसांना लागत नव्हता. परंतु गतमहिन्यातल्या गुन्ह्यात त्याने काही अंतर अगोदरच रिक्षा पकडल्याने त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग पोलिसांना सापडला. त्याच्या घरातून ४६ तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. तर इतर सोने त्याने विकलेल्या सोनारांकडून परत मिळवण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी तब्बल २८ लाख ३३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत केले आहेत. त्याने ऐरोली व कोपर खैरणे परिसरात केलेले घरफोडीचे २० गुन्हे उघड झाले असल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सह आयुक्त डॉ. जय जाधव, अपर आयुक्त महेश घुर्ये, उपायुक्त सुरेश मेंगडे आदी उपस्थित होते.
संतोष याच्यावर यापूर्वीचे १४ गुन्हे असून त्यामध्ये त्याला शिक्षा देखील झालेली आहे. २०१८ मध्ये शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा तो घरफोडी करत होता. परंतु तो अनेक वर्षांपासून ऐरोलीत फिरत असल्याने परिसरातल्या सीसीटीव्हीची त्याला माहिती होती. यामुळे गुन्हा करताना व जाताना तो सीसीटीव्हीत दिसणार नाही याची खबरदारी घ्यायचा. गतमहिन्यात केलेल्या गुन्ह्यात त्याला १० लाखाचे दागिने हाती लागले. हे दागिने पॅंटीच्या खिशात ठेवून तो चालत जात असताना दागिन्यांच्या वजनाने पॅन्ट खाली सरकू लागली. यामुळे नेहमीच्या ठिकाणांऐवजी काही अगोदरच त्याने रिक्षा पकडली. याच रिक्षातील प्रवासामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले.
...तरीही झोपडीतच
संतोष याच्याकडे २८ लाखाचे दागिने असतानाही ते तो विकू शकला नव्हता. हे दागिने झोपडीतच डब्यामध्ये ठेवलेले होते. अनेक सोनारांनी त्याच्याकडून दागिने विकत घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे गरजेनुसार दागिन्यांचा एक एक भाग काढून तो विकून त्यातून पैसे मिळवायचा.