जळगाव : अयोध्या नगरातील बबनराव थोरवे यांची कार लांबविणा-या अब्दूल रहेमान शहाबुद्दीन शेख (३७, रा.धारावी झोपडपट्टी, मुंबई) या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी नागपूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली कार हस्तगत केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बबनराव थोरवे यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता घरासमोर त्यांच्या मालकीची एमएच.१९.सीयू.०३५८ क्रमांकाची कार उभी केली होती. २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता थोरवे हे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर आल्यावर त्यांना कार दिसून आली नव्हती. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात कार चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास इमरान सैय्यद हे करीत होते. या गुन्ह्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी राज्यातील इतर पोलिसांना सुध्दा दिली होती. अखेर चोरीला गेलेली कार ही नागपूरमध्ये दिसून आल्यावर त्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, दिनेश चौधरी यांनी मंगळवारी नागपूर गाठून अब्दूल रहेमान शहाबुद्दीन शेख या चोरट्याला पकडून त्याच्याकडून कार हस्तगत केली आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
दरोड्याचा आहे गुन्हा दाखल...
अब्दूल रहेमान शहाबुद्दीन शेख याच्याविरूध्द नागपूर येथे दोन दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय त्यांची गँग सुध्दा असून त्यांच्या मदतीने तो कार चोरी करायचा. ही गँग कार चोरण्यात माहिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, शेख याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.