देवेंद्र पाठक, धुळे: एकाच रात्री औरंगाबाद ते धुळेदरम्यान तीन ठिकाणी दरोडे टाकून धुमाकूळ घालून दहशत माजविणाऱ्या टोळीतील सहापैकी तिघांना रेखाचित्र आणि त्यांच्या कारच्या नंबरवरून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ६ तासांत यश आले. दरोड्याची घटना धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात रविवारी पहाटे घडली होती. फरार अन्य तिघांचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. दरम्यान, बारकुंड यांनी एलसीबी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पथकाला १० हजारांचे बक्षीस जाहीर केले.
पुण्याच्या वाघोलीतील आप्पा चौकात राहणारे राकेश अमरनाथ कदम हे त्यांच्या मित्रांसह उज्जैन येथील महाकालेश्वराचे दर्शन घेऊन पुण्याकडे जात असताना रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील बालाजी पेट्रोल पंपाजवळ थांबले. एमएच १२ क्यूएल ८०१७ क्रमांकाची कार त्यांनी झोप येत असल्यामुळे थांबविली. ते कारमध्ये झोपलेले असताना सहा दरोडेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. गाडीच्या काच फाेडून राकेश कदम यांना तिघाजणांनी चाकूचा धाक दाखविला. रोकड आणि मोबाइल असा २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन त्यांनी पोबारा केला. याप्रकरणी राकेश कदम यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हा गंभीर गुन्हा असल्याने तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी समांतर तपास सुरू करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी दिले होते.
घटनेच्या वेळी असलेल्या दरोडेखाेराचे रेखाचित्र गाडीतील एकाने काढून पोलिसांना दाखविले आणि लूट केल्यानंतर एमएच १४ बीक्यू १५७३ क्रमांकाच्या लाल रंगाच्या कारमधून दरोडेखोर पसार झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. दराेडेखोर हे शिरपूरच्या दिशेने गेल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाला शिरपूरच्या दिशेने रवाना करण्यात आले. ही कार मध्य प्रदेश राज्यातील सेंधवाकडे जात असताना हाडाखेडजवळ कार थांबविण्यात आली. पोलिसांना पाहून तिघांनी पळ काढला. तीन दरोडेखोर मात्र एलसीबीच्या तावडीत सापडले.
अन्य गुन्ह्याची कबुली- २४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता औरंगाबाद शिवारात धुळे सोलापूर रस्त्यावर कारमधील एकावर चाकू हल्ला करुन दागिने, रोकड हिसकावून घेतले. त्यानंतर कन्नड शिवारात कारवर दगडफेक करुन चार जणांवर चाकूने वार करुन त्यांच्याकडील रोकड हिसकावून घेतल्याची त्यांनी कबुली दिली. राजेश परशुराम राठोड (वय ३१, रा. मांजरीतांडा, ता. मुखेड, जि. नांदेड), जगदीश शिवाजी पवार (वय १९, रा. कमलेवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड), योगेश शंकर पवार (वय ३४, रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड) या तिघांना अटक करण्यात आली आहे.