ठाणे: केवळ एखाद्या मोबाईलसाठी किंवा अवघ्या दोन तीन हजारांसाठी नागरिकांवर चॉपरचे वार करुन लुटमार करणाºया नौशाद उर्फ अतिक हलीम अन्सारी (४४, रा. फातमानगर, भिवंडी) या कुख्यात दरोडेखोरासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने जेरबंद केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी रविवारी दिली. या टोळक्याकडून दोन गावठी रिव्हॉल्व्हरसह, पाच जिवंत काडतुसे, नऊ सुरे, १५ मोबाईल आणि रोकड असा एक लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जबरी चोरीच्या प्रयत्नात असतांना एक कुख्यात दरोडेखोर गंभीर जखमी झाला असून त्याला त्याचे साथीदार रुग्णालयात नेत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दोन भिवंडी पथकाला मिळाली होती. त्याच आधारे पोलिस उपायुक्त पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक विजय मोरे, धनराज केदार, उपनिरीक्षक रमेश शिंगे, रामसिंग चव्हाण आणि हनुमंत वाघमारे आदींच्या पथकाने २८ एप्रिल २०२३ रोजी कुख्यात दरोडेखार नौशाद उर्फ अतिक अन्सारी, इम्रार सय्यद (४०) आणि रोशनअली सय्यद (४०, रा. शांतीनगर, भिवंडी) या तिघांना रात्री ९.१० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत दोन गावठी रिव्हॉल्व्हर, पाच जिवंत काडतुसे आणि एक सुरा अशी हत्यारे आढळली. त्यांच्याविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
सखोल चौकशीमध्ये हे टोळके रात्रीच्या वेळी रस्त्याने येणाऱ्या, जाणाऱ्या तसेच पोळी भाजी केंद्र चालक, सुलभ शौचालय चालक आणि हॉटेल मालकांना चॉपर आणि सुऱ्याने गंभीर दुखापत केल्याची या टोळक्याने कबूली दिली. त्यांच्या घरझडतीमध्ये दोन गावठी रिव्हॉल्व्हरसह एक लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नौशाद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात सहा जबरी चोरीचे आणि दोन खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल असल्याचीही कबूली दिली. तसेच यापूर्वीही त्यांच्याविरुद्ध दरोडयाचे तीन आणि खूनाचा प्रयत्न एक असे गुन्हे शांतीनगरमध्ये दाखल आहेत. या सर्व प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय मोरे हे करीत आहेत. तिघांनाही ४ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
अशी होती एमओबीरात्रीच्या वेळी एखादे सावज हेरुन त्याच्यावर नौशाद चॉपरने वार करायचा. खूनी हल्ला झाल्यामुळे कोणीही शरण येतो. त्यानंतर सहज लूट करता, यायची असे त्याने पोलिसांना सांगितले.