श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून त्यांच्याच निवासस्थानी हत्या करण्यात आली. तीन मारेकऱ्यांनी सुरुवातीला सोफ्यावर बसून त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि थोड्याच वेळात अचानक त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. प्रत्युत्तरादाखल गोगामेडी यांच्या अंगरक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक मारेकरी मारला गेला. दोन आरोपींनी तिथून पळ काढला.
सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. रोहित राठोड असे एका आरोपीचे नाव आहे. जो मकराना, नागौरचा रहिवासी आहे. तर नितीन फौजी असे दुसऱ्याचे नाव आहे. तो हरियाणातील महेंद्रगडचा रहिवासी आहे. सध्या दोघेही फरार आहेत. दोघांनी मिळून सुखदेव सिंग गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या केली. सध्या पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरु आहे.
२० सेकंदात ६ गोळ्या झाडल्या-
जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना सुखदेवच्या घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. २० सेकंदात ६ गोळ्या झाडण्यात आल्याचे दिसून आले. आरोपी एका एसयूव्ही कारमध्ये आले होते, जी पोलिसांनी गोगामेडीच्या घराबाहेरून जप्त केली आहे. त्या गाडीतून एक पिशवी, दारूची बाटली आणि रिकामे ग्लास सापडले. घटनेनंतर एफएसएल टीमच्या मदतीने गोळीबाराच्या ठिकाणाहून म्हणजे घटनास्थळावरून सर्व प्रकारचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
रोहित गोदाराने घेतली जबाबदारी
गोगामेडी यांच्या हत्येनंतर रोहित गोदारा गँगने फेसबुक पोस्ट करत घटनेची जबाबदारी स्वीकारली. ते आपल्या शत्रूंना मदत करत होते, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचा बदला आता घेत असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.
कोण आहे रोहित गोदरा?
गँगस्टर रोहित गोदरा हा गँगस्टर लॉरेन्स विश्नोई टोळीचा भाग आहे. पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गोदरा साला २०२२मध्ये बनावट नावाने पासपोर्ट बनवून देशातून पळून गेला होता. परदेशात जाण्यापूर्वी गोदरा बिकानेरच्या लुंकरानसार येथे राहत होता. २०१९ मध्ये सरदारशहर, चुरू येथे भिनवराज सरन यांच्या हत्येप्रकरणीही तो मुख्य आरोपी होता. गुंड राजू थेहाटच्या हत्येची जबाबदारीही गोदाराने घेतली होती.
पद्मावत’ चित्रपटावेळी आले चर्चेत
श्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कळवी यांच्यासोबतच्या मतभेदातून २०१५ मध्ये गोगामेडी यांनी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची स्थापना केली. ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात त्यांनी विरोध प्रदर्शन केले होते.