७ वर्षापूर्वी एका अमेरिकन कपलने दत्तक घेतलेल्या यूक्रेनी मुलानेच आई वडिलांची निर्दयी हत्या केल्याचे समोर आले आहे. २१ वर्षीय डीमा टावरला रॉबी आणि जेनिफर टावरने यूक्रेनी अनाथालयाहून दत्तक घेतले होते. डिमाने त्याच्या दत्तक आई वडिलांना फ्लोरिडातील त्यांच्या राहत्या घरी चाकूने हल्ला करून मारल्याचा आरोप आहे. शनिवारी सकाळी डिमाला पोलिसांनी अटक केली.
स्थानिक माध्यमानुसार, ईसाई मिशनरी कपलचे जे रिअल इस्टेटच्या व्यवसायात काम करत होते. त्यांचा मृतदेह लिविंग रुमच्या फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रॉबी टावरचे नातेवाईक म्हणाले की, हे जोडपे खूप चांगल्या स्वभावाचे होते. त्यांच्याशी कुणाचेही वैर नव्हते. त्याच्या जीवनात मुलगाच सर्वस्व होता ज्याला त्यांनी दत्तक घेतले होते. डिमाने लहानपणीच त्याच्या आईला गमावले होते. तर वडिलांना दारुचं व्यसन होते. त्यामुळे अनाथालयात त्याला ठेवले होते. सात वर्षापूर्वी कपलने डिमाला दत्तक घेतले.
कपलला मारल्यानंतर डिमा एका कारमधून तिथून फरार झाला. एका जंगलात तो लपला होता. परंतु पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये ८ तासांच्या अथक प्रयत्नात त्याला अटक करण्यात यश आले. जेनिफर आणि रॉबी दोघेही खूप धार्मिक होते, यूक्रेनमध्ये ईसाई मिशनवर ते काम करायचे. हे जोडपे मुलाला जन्म देण्यासाठी असमर्थ होते. त्यासाठी डिमाला त्यांनी दत्तक घेतले. प्रेम आणि काळजीने डिमा त्याचे मागील दुख विसरू शकतो असं जोडप्याला वाटले.
दरम्यान, जोडप्याच्या घरी येण्यापूर्वी मुलाच्या मनात खूप द्वेष भरला होता. हा राग तो आपल्या जवळच्या लोकांवर काढत होता असं जोडप्याच्या नातेवाईकांनी सांगितले. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे. डिमाने दत्तक आई वडिलांना का मारले त्याचे खरे कारण अद्यापही समोर आले नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पोलीस चौकशी करत आहे.