कल्याण- पत्नी सासूमुळे सोडून गेली असा समज झाल्याने एका जावयाने सासूला धडा शिकवण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या इसमाच्या पहिल्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या बहाद्दर जावयाने चक्क बुरखा परिधान केला. जेणेकरून संशय सासूवर येईल. मात्र कोळशेवाडी पोलिसांनी या बनावट अपहरणाच्या बनावाचा पर्दाफाश केला. बहाद्दर जावई संदीप गायकवाड आणि त्याचे साथीदार जावेद खान, आकाश अभंग आणि अवि पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
कल्याण पूर्व भागातील तीस गाव नाका परिसरात संदीप गायकवाड हा आपल्या दोन पत्नीसह राहत होता. संदीपचे अपहरण झाल्याची तक्रार संदीपच्या पहिल्या पत्नीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला मात्र त्याचे खरच अपहरण झाले का याबाबत पोलिसांना देखील संशय होता.
कोळशेवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक हरीदास बोचरे यांनी गुन्ह्याची उकल करण्यासाठी अधिकारी नेमले, समोर आलेल्या माहितीमुळे पोलीस देखील चक्रावले. संदीपची दुसरी पत्नी काही कारणामुळे घर सोडून निघून गेली. पत्नी सासूमुळेच आपल्याला सोडून निघून गेल्याचा संशय संदीपला होता. त्यामुळे सासूबद्दलचा संताप आणि पत्नीचा विरह यामुळे संदीपने स्वतःचाच अपहरण करीत सासूला धडा शिकवायचा आणि पत्नीकडून सहानुभूती मिळवायची असा प्लान आखला.
त्यानुसार त्याचे साथीदार जावेद खान, आकाश अभंग आणि अवि पाटील यांनी त्याला साथ दिली. सासूनेच अपहरण केले असा संशय पोलिसांना यावा म्हणून त्यांनी बुरखा घालत अपहरणाचा बनाव केला होता. आठवडाभराच्या तपासानंतर हा अपहरणाचा बनाव असल्याचा उघड झाला. मात्र आठवडाभर पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.