गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गणपतीसाठी गावी गेलेल्या महाराष्ट्र शासनाच्या माजी वित्त अधिकाऱ्याच्या घरात लाखो रुपयांची घरफोडी करण्यात आली. मुख्य म्हणजे घराच्या खिडक्या आणि दारे बंद असताना हा प्रकार घडला असल्याने या विरोधात संबंधित तक्रारदाराने दहिसर पोलिसात धाव घेतली आहे.
तक्रारदार चंद्रशेखर पाटील हे बोरिवली पूर्वच्या शांतीवन परिसरात राहतात. ते महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात टेक्निकल असिस्टंट या पदावरून सेवानिवृत्त झाले असून १९ सप्टेंबर रोजी पत्नी सोबत पालघरला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गेले होते. पाटील तिथून २४ सप्टेंबर रोजी घरी आले आणि आल्यावर त्यांनी घरात ठेवलेल्या दागिन्याचा डबा उघडून पाहिला मात्र त्यात ठेवलेले जवळपास अडीच लाखांचे दागिने त्यात नव्हते. तेव्हा त्यांच्या ठाणे येथील घरी असलेल्या लॉकरमध्ये ते दागिने ठेवले असतील असे त्यांना वाटले. त्यानुसार ते १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता सदर ठिकाणी गेले मात्र त्यांना दागिने सापडलेच नाहीत. घरी आल्यावर त्यांनी त्यांच्याकडे काम करणारी मोलकरीण, सुरक्षारक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. तर त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. पाटील यांच्या म्हणण्यानुसार ते गावावरून परतले तेव्हा त्यांच्या घराचा कडी कोयंडा हा शाबूत होता. तसेच घराच्या खिडक्याही व्यवस्थित बंद होत्या त्यामुळे सोने नेमके चोरीला गेले तरी कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. पाटील यांनी याप्रकरणी दहिसर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करवला असून अधिक तपास सुरू आहे.