जळगाव : शहरातील अजिंठा चौफूली येथे एका महिलेने धिंगाणा घालत पुरूषावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला होता. या प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी महिला व पुरूषाविरूध्द गुन्हा दाखल केला असून महिलेला महाबळ कॉलनीतून ताब्यात घेतले आहे. माधूरी सागर राजगिरे (३२,रा.रामेश्वर कॉलनी) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली येथील महेंद्रा हॉटेलसमोर एक महिला शिवीगाळ करीत एका पुरूषावर चाकू हल्ला करण्याच्या प्रयत्न करीत असल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. घटनेनंतर कुणीही तक्रार देण्यास न आल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी महिला व पुरूषाचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना त्या महिलेचे माधुरी राजगिरे तर पुरूषाचे सागर भिकन राजगिरे (रा. रामेश्वर कॉलनी) असे नाव निष्पन्न झाले तर दोन्ही पती-पत्नी असून कौटूंबिक वादातून ही घटना घडल्याची माहिती देखील समोर आली. पोलिसांनी सोमवारी महिलेला महाबळ कॉलनी येथून ताब्यात घेतले आहे तर तिच्या पतीचा शोध सुरू आहे. दरम्यान, दोघांविरूध्द भादंवि कलम १६० मुंबई पोलिस कायदा कलम ११२, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल वंजारी, सुधीर साळवे, इमरान सैय्यद, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील यांनी केली आहे.