राजस्थान - मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तरुणाला पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी क्रूरतेची मर्यादा ओलांडली. पोलीस ठाण्यात तरुणाचे कपडे उतरवल्यानंतर क्रिकेटच्या स्टंपवर तेल लावून बसवले. तसेच जबरदस्तीने लघवी प्यायला लावली. हा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील अजमेरच्या जवाजा पोलीस ठाण्यात घडला. तरुणाने सहाय्यक पोलीस अधीक्षक सुमित मेहरा यांच्याकडे लेखी तक्रार करून दोषी पोलिसांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. हर्ष कमल असे पीडित तरुणाचे नाव आहे.
नरेंद्र सिंह (रा. गंगा कॉलनी, उदयपूर रोड चुंगी नाका, बेवार) यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक सुमित मेहरा यांना केलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांचा नातेवाईक हर्ष कमल हा मुलीला पळवून घेऊन गेला होता. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आणि गांधीधाम येथे कामावर निघून गेले. यानंतर जावजा पोलिसांनी हर्षला गांधीधाम येथून पकडून पोलीस ठाण्यात आणले. तसेच त्याचे कपडे काढले आणि लॉकअपमध्ये बंद करून बेदम मारहाण केली.
नंतर पोलीस शिपाई रामराज आणि जितेंद्र सिंग यांच्यासह चार पोलिसांनी क्रिकेटचा स्टंप आणला आणि त्याला तेल लावले. या स्टंपवर बसून छळ केला. इतकेच नव्हे तर जबरदस्तीने लघवी करायला लावले आणि प्यायला लावले. यानंतर पोलिसांनी भादंवि कलम १५१ अन्वये अटक करून उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर हजर केले, असा आरोप हर्षने केला आहे. या प्रकरणात किती सत्यता आहे हे तपासून हर्षने एसपी अजमेर यांच्यासमोर हजर होऊन दोषी पोलीस, पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत सहाय्यक पोलीस अधीक्षक सुमित मेहरा यांना तपासाचे निर्देश दिले.