मधुकर ठाकूर
उरण: मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या मोजून १०० पावलांच्या अंतरावर असलेल्या साईबाबा मंदिरात शनिवारी ( १९) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.साईबाबांची धातुच्या मुर्ती,चांदीचे मुकुट आणि दानपेटी फोडून चोरट्यांनी पैसे चोरून पोबारा केला असल्याची माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्यातुन देण्यात आली आहे. यामुळे मात्र खळबळ माजली आहे.
मोरा बंदराच्या गेटसमोरच आणि मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या मोजून १०० पावलांच्या अंतरावरच साईबाबांचे मंदिर आहे. दररोज पहाटे याच मोरा बंदरातुन ३-४ वाजताच्या सुमारास मच्छीमार महिला मासळी विक्री -खरेदीसाठी मुंबईत जातात. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतरच मासळी विक्रेत्या महिला मुंबईकडे रवाना होतात. त्यामुळे साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी नेहमीच खुले असते.
याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास मोरा येथील साईबाबा मंदिरातच डल्ला मारला.मंदिरातील मोठ्या साईबाबांची मुर्तीवरील चांदीचा मुकुट आणि बाबांची छोटी धातुची मुर्ती चांदीच्या मुकुटासह चोरट्यांनी लंपास केली. इतक्यावरच न थांबता अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरून पोबारा केला आहे.२२ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी तपासासाठी डॉकस्कॉड,ठसे तज्ञांना पाचारण केले होते.मात्र मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या मोजून १०० पावलांच्या अंतरावरच असलेल्या साईबाबा मंदिरातच अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने परिसरात खळबळ माजली आहे.