नवी दिल्ली – शहरातील मंदिर मार्ग पोलिसांनी एका फरार वृद्ध आरोपीला अटक केली आहे. ज्याला ३२ वर्षापूर्वी दिल्लीत एका घटनेसाठी जबाबदार धरलं होतं. ७० व्या वर्षी या फरार आरोपीला पोलिसांनीअटक केली आहे. आरोपी फजरु २२ वर्षापासून पोलिसांना चकमा देत होता. मंदिर मार्ग पोलिसांनी आरोपीचा साथीदार दिनू यालाही २९ ऑगस्टला अटक केली आहे. दीनूदेखील २२ वर्षापासून फरार होता.
डीसीपी ईश सिंघल यांच्य मार्गदर्शनासाठी अधिकारी विक्रमजित सिंह यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपी फजरुला तो राहत असलेल्या बहादुरी गावातून अटक केली आहे. फजरुने दिनू आणि अन्य एका साथीदारासोबत मिळून १९८९ मध्ये दिल्लीतील आंबेडकर नगर येथे चोरी केली होती. परिसरातील एका दुकानाचे शटर तोडून महाग कपडे आणि रोकड पळवण्यात आली होती. आंबेडकर नगर पोलिसांनी त्यावेळी फजरु आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. त्यांच्याकडून चोरलेले कपडे पुन्हा जप्त करण्यात आले होते.
कोर्टाने फजरुला जामीनावर सोडलं होतं. त्यानंतर फजरु कधीच कोर्टासमोर हजर झाला नाही. त्यानंतर कोर्टाने फजरुला ४ जून १९९८ मध्ये फरार घोषित केले. फजरु हा कुख्यात चोर होता. तो रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये चोरी करत असे. त्याचसोबत गोवंश प्रकरणातही पोलिसांनी त्याला अटक केली होती. हरियाण, राजस्थान पोलिसांनी फजरुला अनेक गुन्ह्याखाली अटक केली होती. फजरु अलवर जेल, राजस्थान, भोंडसी जेल हरियाणा, किसनगढ जेल, राजस्थान आणि तिहाड जेलमध्ये अटकेत होता. पटियाला कोर्टाने फजरुला ४ जून १९९८ ला फरार घोषित केल्यानंतर तो आजतागायत पोलिसांच्या तावडीत सापडला नव्हता.