मडगाव - गोव्यातील मडगाव येथील कंदब परिवहन महामंडळाच्या डेपोतून इंधनची चोरी होत असल्याचा गोष्टीचा भांडाफोड झाला आहे. काल रविवारी डिझेल चोरीची ही घटना उघडकीस आली होती. मागाहून मडगाव कंदब डेपोचे मॅनेजर आर. ए. लुईस यांनी यासंबधी फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. आज सोमवारी पोलीस तपासात तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तपास केला प्रथमदर्शनी तपासात या डेपोत पुरवठा होत असलेल्या डिझेलची चोरी होत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी डेपोत इंधन पुरवठा करणाऱ्या मेसर्स वेर्णेकर ट्रान्सपोर्टचे अरविंद वेर्णेकर तसेच टँकर चालकावर गुन्हा नोंद केला आहे. या चोरी प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असून, इंधन चोरी करणाऱ्या माफियांचा त्यात सहभाग असावा असा पोलिसांना संशय आहे. पुढील तपास चालू असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.भारतीय दंड संहितेच्या ३७९, २८५ व पेट्रोलियम कायदा २००० कलम १२ अंतर्गंत पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. रविवारी जीए०८ व्ही ८८२५ हा इंधन घेउन कदंबच्या डेपोत आला होता. कंदब वाहतूक परिवहनच्या टँकर तपासणी समितीने या टँकरची तपासणी केली होती. नंतर टँकर आत सोडला होता. मे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपरेशन लिमिटेड १२ केएल हायस्पीड डिझेलचा पुरवठा करतात. मे. वेर्णेकर ट्रान्सपोर्ट हा टँकरव्दारे इंधन मडगावच्या कंदबाच्या डेपोत पोहचवितो. आतमध्ये असलेल्या टाकीत हे इंधन साठवून ठेवले जातात. रविवारी इंधन टाकीत सोडल्यानंतर मास्टर व्हॉल्व सुरु केला असता, टँकरच्या इंधन टाकीलाही गळती लागली. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना संशय आला. चौकशीअंती टाकीच्या खालच्या भागातून एक पाईप टँकरच्या टाकीला जोडला होता असे आढळून आले. मात्र टँकरची टाकीत आधीच डिझेल असल्याने इंधन जास्ती होउन ते बाहेर पडायला लागले व चोरीचे बिंग फुटले.
डेपोतील टाकीत डिझेल सोडल्यानंतर ते खालच्या टाकीत जाते, त्या टाकीत एक पाईप बसविला होता. तो पाईप टॅकरला जोडून डिझेलची चोरी केली जात होती असे प्राथमिक तपासात पोलिसांना आढळून आले आहे. सध्या तपास प्राथमिक स्थितीत असल्याने पोलिसांनी तपासकामाबददल गुप्तता बाळगली आहे. फातोर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत याच वर्षी एका पेट्रोल वाहू टँकरमधून इंधनची चोरी करण्याचे प्रकरण घडले होते. सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपला इंधन पुरविणाऱ्या टँकरमधून पेट्रोलची ही चोरी करण्यात आली होती. स्वत: फळदेसाई यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी नंतर सर्व संशयितांना अटकही केली होती. कंदबाच्या डेपोत डिझेलची जी चोरी झाली आहे त्याचे कनेक्शन फातोडर्यातील त्या इंधन चोरी प्रकरणाशी असावे असाही पोलिसांचा कयास आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे जो टँकर पोलिसांनी पकडला आहे त्याचे मालक हे फातोडर्यातील इंधन चोरी प्रकरणात पकडलेल्या एका संशयिताच्या कुटुंबातील आहे. टँकर सध्या कुणाच्या नावे आहे, याची शहानिशा सध्या पोलीस करीत आहेत.