लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथमधील कंपनीत सुरक्षारक्षकाने तब्बल ८२ लाखांच्या स्टीलच्या शीट चोरल्या आणि नंतर स्वतःच चिठ्ठी लिहून या चोरीची कबुली दिल्याचा प्रकार समोर आला आहे. वरिष्ठांकडून होत असलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ही चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे.
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत युनिफॅब इंजिनिअरिंग कंपनी आहे. त्यातील सुरक्षा रक्षक अर्जुन बोराह याने गोदामात ठेवलेल्या स्टीलच्या शीट साथीदारांच्या मदतीने चोरल्या आणि भंगारात विकून तो गावी निघून गेला. त्यानंतर चार अनोळखी लोकांनी येथे शीट विकल्या जातात का, याबाबतची चौकशी केली. अर्जुन नावाच्या मॅनेजरने आम्हाला ही माहिती दिल्याचे सांगितले. संबंधितांनी अर्जुन काम करीत असलेल्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. अर्जुनचा ड्राॅव्हर उघडून पाहिला. त्यात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात चोरीचा मास्टरमाइंड कोण आहे, चोरीचा माल कुणाला विकला, त्यांची नावे आणि फोन नंबर होते.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख आणि उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवीत सहा जणांना अटक केली. मुख्य सूत्रधार फरार आहे. चोरलेले ८२ लाख ५० हजार रुपयांचे स्टील शीट बंडल जप्त करण्यात आले आहे.