मुंबई : चोरीच्या नवनवीन घटना समोर येत असताना काळाचौकी येथील मंगल ज्वेलर्समध्ये चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी रस्त्यावरील वीज प्रवाह खंडित केला. पुढे दुकानाचे शटर तोडून तब्बल पावणे तीन कोटीच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला आहे. काळाचौकी येथील आंबेवाडी परिसरात हे दुकान आहे. तक्रारदार सराफ हे शेजारील इमारतीत राहण्यास आहेत. सोमवारी सकाळी दुकानाचे शटर उघडे असल्याची माहिती मिळताच त्यांनी दुकानात धाव घेतली. रिकामी झालेले दुकान नजरेस पडताच त्यांना धक्का बसला. घटनेची वर्दी लागताच काळाचौकी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी दुकानातील, बाहेरील सीसीटीव्ही फोडले आणि डिव्हिआरही सोबत नेल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे दुकानासमोरील रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे दुकानाजवळील वाट वाहतुकीसाठी बंद होती. याचाच फायदा घेत त्यांनी दुकानाला टार्गेट करत, आधी रस्त्यावरील वीज प्रवाह खंडित केला. नंतर दुकानातील दागिन्यांवर हात साफ केला आहे.त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. यात ओळखीच्या व्यक्तींसह परिसरातील अन्य सीसीटीव्हीद्वारे चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावणेतीन कोटी रुपयांच्या सोने, चांदी दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 7:19 AM