ठाणे: शिवाईनगर येथे वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानातून चोरट्यांनी रविवारी पहाटे 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास अंदाजे दोन कोटींच्या दोन ते तीन किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली. गुन्हे अन्वेषण विभागासह तीन पथके या चोरीच्या तपासासाठी नेमल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परराज्यातील एका व्यक्तीने ह्या ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूचे दुकान दोनच महिन्यापूर्वी भाड्याने घेतले. ,२८ हजारांचे भाडे मिळते म्हणून पाटील या दुकान मालकाने काहीही चौकशी न करता या अनोळखीला दुकान भाड्याने दिले. आपला फळांचा व्यवसाय असून त्यासाठी हा गाळा हवा आहे असे त्याने सांगितले होते, दोन महिने दिखाव्यासाठी त्यांनी फळ विकण्याचाही बनाव केला. शनिवारी रात्री दोन्ही दुकानामधील भिंतीला छोटेसे भगदाड पाडून चोरट्यांनी सराफाच्या दुकानात शिरकाव केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी तिजोरी फोडून त्यानी सोने आणि चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त निवृत्ती कदम यांच्यासह वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.