राजगुरुनगर : खेड सत्र न्यायालयाचे दिवाणी न्यायधीश महोदयांच्या निवासस्थानालाच चोरट्यांनी लक्ष केले आहे. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) सुजितकुमार चंद्रकांत तायडे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी २३ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व स्मार्ट टीव्ही असा एकूण ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तायडे हे करंडेवस्ती (सातकरस्थळ) येथे राहावयास असून ३ नोव्हेंबरला दिवाळीच्या सुट्टीसाठी आमगाव (जि. गोंदिया) येथे गेले होते. सोमवारी (दि.१२) त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कोरडे यांना घराचा कडी कोयंडा उचकटलेला दिसला. घरातील सर्वत्र वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यांनी याची माहिती तायडे यांना दिल्यानंतर ते मंगळवारी (दि. १३) खेडला आले. घराची पाहणी केली असता वरीलप्रमाणे ऐवज चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी खेड पोलीस ठाण्यात दाखल केली. यावर चोरट्यांनी कहर करतानाच घरातील पासबुक व एफडी पावत्या देखील लांबविल्या आहेत. खेड पोलीस या चोरीप्रकरकणाचा तपास पोलीस हवालदार आर.डी. गवारे करत आहेत...........................दुष्काळी स्थितीमुळे चोरांच्या टोळ्या सक्रीय झाल्याचे जिल्ह्यात जाणवत आहे. दिवाळीत सुटीला बाहेरगावी जाताना नागरिकांनी शेजारी लोकाना कल्पना देऊन जावे. स्वत:च्या व्यवहारातील तपशील जाहीरपणे बोलू नये. अनावश्यक डामडौल किंवा दिमाखात वावर टाळावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी याबाबत केले आहे.
राजगुरुनगरमध्ये चोरट्यांनी फोडले थेट न्यायाधीशांचेच घर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 7:17 PM
दिवाळीच्या सुट्टीला गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चक्क न्यायधीशाचे घरावरच हात मारला...
ठळक मुद्देघरातील पासबुक व एफडी पावत्या देखील लांबविल्या