कल्याण : केडीएमसीने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या घरांमधील नळ, किचनच्या लाद्या, खिडक्यांचे स्लाइडिंग, दरवाजे चोरीला गेल्याची घटना घडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ नागरिकांनी बनवून तो मनपा प्रशासनास सादर केला आहे. या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.पूर्वेतील न्यू गोविंदवाडी परिसरात मनपाने ‘बीएसयूपी’तून घरे बांधली आहेत. त्यातील काही घरांचे लाभार्थ्यांना वाटप केले आहे, तर काहींचे वाटप न झाल्याने ती धूळखात पडली आहेत. त्यातील नळ, किचनच्या लाद्या, दरवाजे, खिडक्यांचे स्लाइडिंग चोरट्यांनी चोरण्याचा सपाटा लावला आहे. त्याचा व्हिडीओ नागरिकांनी काढून मनपास पुरावा म्हणून सादर केला आहे. या प्रकरणी आयुक्तांना विचारताच ते म्हणाले, चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.केंद्रातील यूपीए सरकारच्या काळात मनपाने शहरातील गरिबांसाठीच्या ‘बीएसयूपी’तून सात हजार घरे बांधली. त्यातील १,४५० घरांचे लाभार्थ्यांना वाटप केले आहे. उर्वरित तीन हजार घरे ही पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित केली आहेत. मात्र, पुढील कार्यवाही झालेली नाही. रेल्वेच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पात बाधित होणाऱ्या ८४० जणांना घरे देण्यात आली आहेत. त्या बदल्यात महापालिकेस रेल्वेने घरांचे पैसे दिले आहेत. त्या व्यतिरिक्त २,७१० घरे शिल्लक असून, ती धूळखात पडली आहेत. त्यांच्यासाठी लाभार्थी निश्चित केलेले नाहीत. मनपाच्या रस्ते विकास प्रकल्पात बाधित होणाऱ्यांना ही घरे देण्यात येणार आहेत.
‘बीएसयूपी’ घरांमधील साहित्याची चोरी, नागरिकांनी काढला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 1:36 AM