नवी दिल्ली : ८१ कोटी भारतीय नागरिकांची नावे, आधार, पासपोर्ट, बँक खात्याचा तपशील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) माहिती साठ्यातून चोरून ती डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध करणाऱ्या चार जणांना तपास यंत्रणांनी काही दिवसांपूर्वी अटक केली. या महिन्याच्या प्रारंभी दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने सदर प्रकरणाची स्वत:च दखल घेऊन एफआयआर नोंदविला होता. देशात आजवर झालेली माहितीची ही सर्वात मोठी चोरी असल्याचे सांगण्यात येते.
माहिती चोरीप्रकरणी अटक केलेल्या चार जणांमध्ये एक जण ओडिशाचा रहिवासी असून, त्याने बीटेक पदवी शिक्षण घेतले आहे. तर अन्य दोन जण हरयाणा व एक जण झांशी येथील आहे. हरयाणातील दोन आरोपींनी शालेय शिक्षण अर्धवट सोडले आहे. या चौघांना दिल्ली न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
गेमिंग प्लॅटफॉर्मवर ओळखगेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या चार जणांची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली. त्यांनी कमीत कमी वेळेत खूप पैसे कमाविण्याचे ठरविले. त्यांना १ लाख लोकांच्या आधार व पासपोर्टच्या माहितीचा तपशील मिळाला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणात अधिक लक्ष घातले. आयसीएमआरच्या माहिती साठ्यातून ८१ कोटी भारतीयांच्या पासपोर्ट व आधार, बँक खात्यांचा तपशील चोरून त्यांनी तो डार्क वेबवर तो विक्रीस उपलब्ध केला.