पुणे : पुणे शहरात घरफोडी, जबरी चोरी करुन धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला वानवडी पोलिसांनी जेरबंद केले़ अटक केलेले चौघेही सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सोनारालाही पोलिसांनी अटक केली आहे़. उजालासिंग प्रभुसिंग टाक (वय २७), गोरखसिंग गागासिंग टाक (वय २९), बल्लूसिंग प्रभुसिंग टाक (वय ३०), जलसिंग रजपुतसिंग दुधानी (वय २६, सर्व रा. रामटेकडी, हडपसर), सत्यनारायण देवीलाल वर्मा (वय ४३, रा़ लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. याबाबतची माहिती सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली़. यावेळी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील उपस्थित होते़. वानवडीमध्ये ११ ऑगस्ट रोजी घरफोडी झाली होती़. उपनगरांमध्ये होत असलेल्या घरफोड्या, जबरी चोरीच्या गुन्ह्यांविषयी पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी मंगळवारच्या बैठकीत गंभीर दखल घेतली़. त्यानंतर या घरफोड्यांच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले़. पोलीस शिपाई नासीर देशमुख आणि सुधीर सोनवणे यांनी परिसरातील सर्व ४१ सीसीटीव्ही फुटेजची बारकाई तपासणी केली़. त्यातून संशयित गुन्हेगाराच्या हालचालीचे निरीक्षण करुन ते शिकलकरी असल्याचा स्पष्ट झाले़. त्यानंतर या पथकातील महेश कांबळे, नवनाथ खरात यांना गोरखसिंग टाक व उजाला टाक यांची माहिती मिळाली़. त्यावरुन दोघांना रामटेकडीतील अंधशाळेजवळ पकडण्यात आले़. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांचे साथीदार धुळे येथे असल्याचे समजले़. तेव्हा वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक आसाराम शेटे व तपास पथकातील कर्मचारी धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथे गेले़. त्यांनी सलग तीन दिवस सापळा लावून बल्लुसिंग टाक याला पकडले़. त्यावेळी झालेल्या झटापटीत जलसिंग दुधाणी याने पगडीत ठेवलेल्या ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर, छातीवर वार करुन घेतले़. त्यावेळी त्याच्या हातातून ब्लेड काढून घेताना पोलीस शिपाई सोनवणे जखमी झाले़. त्याही परिस्थितीत पोलिसांनी दोघांना पकडून धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करुन पोलिसांना कल्पना दिली़. चौघांकडे केलेल्या चौकशीत पुणे शहर व परिसरात केलेल्या घरफोडी व जबरी चोरीचे ५० गुन्हे उघडकीस आले आहेत़.
...........
* तीन डझन गुन्हे दाखल
या टोळीविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत़. उजाला प्रभूसिंग टाक याच्याविरुद्ध ३६, बल्लुसिंग टाक याच्याविरुद्ध २१, गोरखनाथ टाक याच्याविरुद्ध २५ गुन्हे तर जलसिंग दुधाणी याच्याविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत़. या टोळीने भोसरी एमआयडीसी येथे एकाला मारहाण करुन त्याच्याकडील मारुती सुझुकी मोटार जबरदस्तीने चोरुन नेली होती़ . त्या व इतर चारचाकी गाड्यांवरुन आरोपी फिरुन सोसायट्यांमध्ये जाऊन अगोदर रेकी करीत. त्यानंतर बंद घरे कटावणीने फोडून आतला माल चोरुन नेत असत़. कोथरुड येथील घरफोडी करताना त्यांना विदेशी बनावटीचे पिस्टल व ६ जिवंत काडतुसे चोरली होती़. त्यांच्याकडून ते पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़. या टोळीकडून ५० गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून त्यात वानवडी पोलीस ठाण्याचे ८, हडपसर ७, दत्तवाडी, कोंढवा, भारतीय विद्यापीठ प्रत्येकी ३, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, डेक्कन, कोथरुड, कोरेगाव पार्क येथील प्रत्येकी २, यवत ५, शिक्रापूर, लोणीकाळभोर २ गुन्ह्यांचा समावेश आहे़. ़़़़़़़़़चालण्याची ढब बदलण्याची चलाखीया सराईत गुन्हेगारांनी चोरी करताना अगोदर रेकी करीत़ शहरात आता अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत़. सोसायट्यांमध्येही सीसीटीव्ही कोठे आहेत, हे ते जाणून घेत़. एरवी सरळ चालत असतानाच सीसीटीव्हीच्याजवळ येताच ते आपल्या चालण्याच्या पद्धतीत बदल करीत असत़. त्यामुळे इतके दिवस ते पोलिसांना गुंगारा देत होते़. पोलिसांनी वानवडी, हडपसर परिसरातील ४१ सीसीटीव्हींच्या फुटेजचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर त्यातून घरफोडी करणारे हेच चोरटे असावेत, या निष्कर्षांपर्यंत पोलीस आले़. त्यानंतर त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले़.
........................
ही कामगिरी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, सहायक निरीक्षक आसाराम शेटे, उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड, सहायक फौजदार रमेश भोसले, हवालदार राजू रासगे, संभाजी देविकर,योगेश गायकवाड, धर्मा चौधरी, नासिर देशमुख, सुधीर सोनवणे, नवनाथ खताळ, महेश कांबळे, प्रतिक लाहीगुडे, अनुप सांगले, प्रविण उत्तेकर, राणी खांदवे, वनिता कोलते यांनी केली आहे़