मीरारोड - बंद असलेले घर हेरून चोरी करण्यासाठी लॉक उघडायचे म्हणून चावी वाल्यास बोलावले होते. पण चावी न बनल्याने लॉक तोडून ४ लाख रोख व सोन्याचे दागिने चोरले. परंतु चावीवाल्यास गुगल पेने दिलेल्या ५० रुपयांवरून गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली, तर मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे.मीरारोडच्या डॉ. श्रीकांत जिचकर चौक समोरील लतीफ पार्क मध्ये घर असणारे घर मालक हे कामानिमित्त परदेशातील कुवैत येथे असतात. त्यांच्या घराचे लॉक फोडून चोरटयांनी घरातील ४ लाख रोख, सोन्याचे दागिने आणि काही मालमत्तेची कागदपत्रे आदी चोरून नेल्याचे २७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आले. या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी घर मालकाशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला. गुन्ह्यातील रक्कम व दागिने जास्त असल्याने या प्रकरणी गुन्हे शाखेने देखील स्वतंत्र तपास चालवला होता.
गुन्हे शाखेच्या पथकाने तपासादरम्यान एका वृद्ध इसमाकडून माहिती मिळाली की, सदर घराचे लॉक उघडण्यासाठी चावीवाला बोलावण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील चावीवाल्यांकडे चौकशी सुरु केली. त्यावेळी एका चावीवाल्याने आपणास सदर सदनिकेचे लॉकची चावी बनवण्यासाठी नेले होते. पण लॉक पहिले असता ते शक्य नाही म्हणून सांगितले. परंतु मेहनत म्हणून ५० रुपये त्या इसमाने गुगल पेद्वारे चावीवाल्याचे खाते नसल्याने त्याच्या शेजारी बसणाऱ्या चर्मकाराच्या खात्यात जमा केले होते. पोलिसांनी लागलीच चर्मकाराकडे चौकशी केली व त्याच्या बँक खात्यातून माहिती घेऊन ५० रुपये जमा करणाऱ्या खातेधारकाचा शोध लावला आणि चोरीच्या गुन्ह्यातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलासह इस्माईल इर्शाद अहमद शेख (२२) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी असलेले राहुल चाैहान मात्र नेपाळ येथे पळून गेला आहे.राहुल व १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने मिळून सदर घरफोडी केली. घराच्या देखभालीची जबाबदारी दिलेल्या व्यक्तीच्या परिचयातील तो अल्पवयीन आरोपी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तर चोरीचे दागीने हे राहुल ने इस्माईल कडे ठेवण्यास दिले होते . गुन्हे शाखेने आरोपीस अटक करून २२८ ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत केले व मीरारोड पोलिसांच्या हवाली केले आहे. तर मीरारोड पोलिसांनी आरोपीच्या शीतल नगर येथी घरातून ३०२ ग्राम असे मिळून एकूण ५३० ग्राम दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सदर दागिन्यांची किंमत सुमारे १५ लाखांच्या घरात आहे. पोलीस हे मुख्य आरोपी राहुलचा शोध घेत आहेत.