नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये २०१९ या वर्षात दर दिवशी बलात्काराचे सरासरी ८७ गुन्हे नोंदवले गेले. तर या वर्षभरात महिलांसंबंधीचे एकूण ४ लाख ५ हजार ८६१ गुन्हे नोंद झाले. हे प्रमाण २०१८ च्या तुलनेमध्ये ७ टक्क्यांनी अधिक आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे.नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) ने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात महिलांबाबतचे ३ लाख ७८ हजार २३६ गुन्हे नोंदवले गेले होते. आकडेवारीनुसार २०१९ मध्ये बलात्काराचे एकूण ३२ हजार ०३३ गुन्हे नोंद झाले होते. दरम्यान, वर्षभरामध्ये ही आकडेवारी ७.३ टक्क्यांनी वाढली.सरकारने प्रसिद्ध केलेल्या नव्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये भारतात दररोज हत्येचे सरासरी ७९ गुन्हे नोंद झाले होते. २०१९ या संपूर्ण वर्षात हत्येचे २८ हजार ९१८ गुन्हे नोंद झाले. हे प्रमाण २०१८ च्या (२९ हजार १७ हत्या) तुलनेत ०.३ टक्क्यांनी कमी आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले की, नव्या आकडेवारीमध्ये पश्चिम बंगालने आपल्याकडी आकडे दिलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय आणि शहरानुसार आकडेवारीसाठी २०१८ मधील आकडेवारीचा वापर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी कोरोनाच्या काळात माहिती गोळा करण्याचे काम केल्याबद्दल सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आभार मानले आहेत.केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत काम करणारा एनसीआरबी देशभरातील क्राइम डेटा एकत्र करून त्याचे विश्लेषण करते. या एजन्सीने ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि ५३ महानगरांमधील आकडेवारी एकत्रित केल्यानंतर तीन भागांमध्ये अहवाल तयार केला आहे.