औरंगाबाद : क्लोन धनादेशाद्वारे फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटमधील सहा जणांंना गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात अटक केली. अशा प्रकारे देशभरात अनेक टोळ्या बनावट धनादेशाद्वारे मोठ्या कंपन्यांच्या खात्यातून परस्पर लाखो रुपये काढत असल्याचे समोर आले. या टोळ्याच्या म्होरक्याचा अद्याप शोध न लागल्याने या कारवाईची माहिती गुन्हे शाखेने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) कळविण्यात आली आहे.
बनावट धनादेशाद्वारे ठाणे जनता सहकारी बँकेतून (टीजेएसबी) ३ लाख ९३ हजार २९३ रुपये काढल्यानंतर अन्य एका बनावट धनादेशाद्वारे ४ लाख ८० हजार रुपये काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला शहर गुन्हे शाखा पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २६ जून रोजी पकडले. आरोपी हरीश गोविंद गुंजाळ, मनीषकुमार जयराम मौर्या ऊर्फ राकेश ऊर्फ मनीष यादव ऊर्फ अमित सिंग, मनदीपसिंग, रशीद खान, डबलू शेख आणि इसरार खान ही टोळी सध्या पोलीस कोठडीत आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत म्हणाले की, अटकेतील टोळी ही सिनेमास्टाईल काम करीत होती. यातील केवळ हरीश आणि इसरार हे परस्परांना ओळखतात. तसेच रशीद आणि इसरार खान हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.
बनावट धनादेशाद्वारे फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केल्यानंतर चार बँकांच्या तक्रारी आल्याची माहिती सावंत यांनी दिली. मात्र बँका फिर्याद नोंदविण्यासाठी पुढे येत नाहीत. सिडको पोलिसांना प्राप्त झालेल्या तक्रार अर्जात एका बँकेला साडेचार लाखाला गंडविण्याचा प्रयत्न झाला. आपल्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी बँकेत एक धनादेश आल्याचा संदेश प्राप्त होताच त्या कंपनीने बँकेला फोन करून पेमेंट अदा न करण्याचे कळविल्याने खातेदाराची रक्कम सुरक्षित राहिली. कर्नाटक बँकेची दोन लाखाची आणि साऊथ इंडियन बँकेचीही फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरात पोलिसांनी पकडली टोळीअशाच प्रकारे गुजरात राज्यातील मनीनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका बँकेतील ग्राहकाच्या खात्यातून ४ कोटी रुपये आदेश दत्ता ट्रेडिंग या बनावट कंपनीच्या खात्यात बनावट धनादेशाद्वारे वळते करण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या फसवणूकप्रकरणी गुजरात पोलिसांनी मुंबईतून पाच जणांना अटक केली. ती टोळी वेगळी होती. अशाच प्रकारे वर्धा आणि केरळ, आंध्र प्रदेशमध्येही बनावट धनादेशाद्वारे मोठ्या रकमा बनावट खात्यात वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे.