मुंबई: पती-पत्नीच्या भांडणात कोणी पडू नये, असे म्हटले जाते. मात्र, - बोरीवली पोलिसांना यात पडावे लागले कारण बेडवर झोपण्याच्या वादातून झालेला पती-पत्नीचा वाद. या भांडणात पतीने पत्नीच्या इतकी जोरात कानशिलात लगावली की तिच्या ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम झाला आहे. याप्रकरणी बोरीवली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
बोरीवली पश्चिमेच्या रामबाग लेन येथील एका गृहनिर्माण संस्थेत है दाम्पत्य राहते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार महिलेने एप्रिल २०२२ मध्ये पतीकडे घटस्फोट देण्याची मागणी केली. मात्र, त्याने नाते तोडण्यास नकार दिला. याच कारणास्तव त्यांच्यात सतत भांडण आणि हाणामारी होत होती. महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, या जोडप्याच्या घरात एकच बेड आहे. ज्यावर आळीपाळीने झोपण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
शनिवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला बेडवर झोपली होती. तेव्हा पती तिथे आला आणि त्याने तिला उठवत त्याला स्वतःला तिथे आराम करायचा असल्याचे सांगितले, मात्र आज बेडवर झोपायची पाळी माझी आहे, असे उत्तर पत्नीने दिले. त्याच कारणावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि पतीने तिला एक जोरदार कानशिलात लगावली. यात तिला गंभीर दुखापत झाल्याचा दावा फिर्यादीने करत ताबडतोब मित्राला फोन करून मदत मागितली. या महिलेवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. घटनेने खळबळ उडाली आहे.
ऐकण्याच्या क्षमतेवर झाला परिणाम-
तक्रारदार डॉक्टरकडे गेली आणि तिला सांगण्यात आले की, तिच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. याप्रकरणी तिने बोरीवली पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली आहे. हा वाद बेडवर झोपण्यावरून सुरु झाला आणि हाणामारी झाली. ज्यात पत्नी जखमी झाली असून, आम्ही अधिक तपास करत आहोत, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.