इंदूरमध्ये आठवड्याभरात सलग तिसरा हत्याकांड घडला आहे. गुरुवारी रात्री कुत्रा फिरविण्यावरून झालेल्या वादात बँकेच्या गार्डने शेजाऱ्यांवर छतावरून धडाधड गोळीबार केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे रात्रभर या भागात दहशतीचे वातावरण होते.
आरोपी राजपाल राजावत हा बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा रक्षक आहे. त्याने त्याच्याकडील १२ बोअरच्या बंदुकीतून धडाधड गोळ्या झाडल्या. यामध्ये भावोजी-मेव्हण्याचा मृत्यू झाला. सहा जखमी झाले आहेत. राजपालने आधी दोन फैरी हवेत झाडल्या, नंतर तिथे जमलेल्या लोकांवर झाडल्या. मृत राहुल, वडील महेश वर्मा आणि विमल हे वाद सोडविण्यासाठी आले होते.
आरोपी राजपालला अटक करण्यात आली आहे. त्याची बंदूक आणि परवानाही जप्त करण्यात आला आहे. विमल यांचे निपानिया येथे आरोपी व मृतकाच्या घरासमोर सलून आहे. त्याचा विवाह राहुलची बहीण आरती हिच्याशी 8 वर्षांपूर्वी झाला होता. त्याला दोन मुली आहेत, असे अतिरिक्त डीसीपी अमरेंद्र सिंह यांनी सांगितले.
रात्री 11 वाजता आरोपी गार्ड राजपाल कुत्र्याला फिरवत होता. यादरम्यान दुसरा कुत्रा आला आणि दोन्ही कुत्र्यांची जुंपली. यावेळी एका कुटुंबाने आक्षेप घेतल्यावर वादावादी झाली. वाद वाढल्यावर सुरक्षारक्षक घराकडे धावला आणि बंदुक घेऊन पहिल्या मजल्यावर पोहोचला आणि गोळीबार सुरू केला. जीव वाचवण्यासाठी तिथे जमलेले लोक इकडे तिकडे धावू लागले. राहुल आणि विमल यांना गंभीर अवस्थेत एमवाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.