ठाणे - गुडविन ज्वेलर्सचे प्रमुख मालक असलेले सुनिलकुमार आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण हे दोघे भाऊ शुक्रवारी ठाणो न्यायालयात शरण आल्यानंतर ठाणे शहर पोलिसांनी त्या दोघा भावांना अटक केली. त्यांच्याविरोधात आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तीन गुन्ह्यांसह राज्यात एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत अंदाजे 25 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर, त्यांच्याकडून 20 कोटींची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील डोंबिवली, नौपाडा, शिवाजीनगर या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुडविन ज्वेलर्स यांचे सोन्याचे दागिने विकण्याचे शोरूम होते. सोन्या-चांदीचे दागिने विक्री करताना,त्या भावांनी स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच सोने खरेदीकरीता आगाऊ रक्कम स्विकारण्यास सुरूवात केली. अशाप्रकारे त्या भावांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सुमारे 1 हजार 154 गुंतवणुकदारांकडून अंदाजे 25कोटी रुपये स्विकारले.तसेच गुंतवणुकदारांना कबुल केल्याप्रमाणो परतावा न देता 21 ऑक्टोबर 2019 रोजी दुकाने बंद करून त्या भावांसह मॅनेजिंग डायरेक्टर हे कुटुंबासह पळून गेले म्हणून त्यांच्याविरूद्ध तिन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्या भावांसह साथीदारांचा शोध सुरू झाला. याकरिता मागील दीड महिन्यांपासून ठाणे गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखा यांचे पथकांनी केरळ राज्यातील त्रिशुर येथे तळ ठोकून होते.याचदरम्यान,पोलिसांनी तेथील स्थानिक जनतेच्या, अकराकरण यांचे चालक आणि नातेवाईकांच्या मदतीने शोध मोहिम हाती घेतली होती. त्याद्वारे त्यांचा मालमत्तेचा शोध घेत त्या भावांच्या मालकीची मालमत्ता,बँक खाते इत्यादी सर्व गोठविण्यात आले. यामध्ये शोरूम,घर,बंगले,फार्म हाऊस,शेतजमिन,मर्सिडीज,फॉच्यरुनर,म्युचुअल फंडस्,एलआयसी,शेअर्स अशा मालमत्तेचा समावेश आहे. अशाप्रकारे,त्यांची सर्व बाजूने शोध मोहिमेद्वारे पूर्णत: नाकेबंदी केली होती.त्यातून,शुक्रवारी गुडविन ज्वेलर्सचे प्रमुख मालक अकराकरण हे शुक्रवारी ठाणे विशेष न्यायालयाच्या एमपीआयडी कोर्टात शरण येणार असल्याची माहिती ठाणो शहर पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार, त्या भावांना न्यायालयातून ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम 420,406,34,409 सह कलम 3,4 एमपीआयडी अॅक्ट 1999 सह कलम 3,4,5 बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझीट स्कीम अॅक्ट 2019 या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील पालघर, वसई, पुणे अशा 6 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये नव्याने जुलै 2019 मध्ये पारीत करण्यात आलेला बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझीट स्क्रीम अॅक्ट 2019 याचा देखील समावेश क रण्यात आला. तर, त्या भावांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त जाधव यांनी सांगितले. दरम्यान, गुडविन ज्वेलर्समधील गुंतवणुकीमध्ये ज्या गुंतरणुकदारांची फसवणुक झाली आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारीबाबत ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे.