नवी दिल्ली : दिल्लीला येऊन एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोन परदेशी तरुणांना अटक करण्य़ात आली आहे. ते केवळ या कामासाठी युक्रेनहून दिल्लीला येत असत. त्यांच्याकडून क्लोन केलेले 137 कार्ड आणि 4 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यांच्याकडे 4 पावत्याही मिळाल्या आहेत. ज्यावर एटीएमकार्डांचे पिन लिहिलेले होते.
पोलिसांना सांगितले आरोपी युक्रेनचे राहणारे असून मिखाइलों लूकियानों उर्फ माइओसा (24) आणि मॅक्सिम दौरोफीव (30) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनाही टागोर गार्डन मेट्रो स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले. 137 कार्ड आणि 4 लाख रुपयांबाबत पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत.
या दोन्ही आरोपींची भाषा समजण्यासाठी पोलिसांना दोन दिवस लागले. यासाठी दुभाषाची मदत घेण्यात आली होती. मात्र, ते खरे बोलत आहेत की नाही याबाबत काही अंदाज पोलिसांना आलेला नाही. हे दोघेही भारतात युक्रेनहून पैसे काढण्यासाठी येत होते आणि पुन्हा दिल्ली विमानतळावरून युक्रेनला जात होते. हे पैसे ते परदेशी मुल्यामध्ये बदलून कपड्यांमध्ये लपवून नेत होते.
अशाप्रकारे या दोघांनी पाच ते सहा वेळा भारतात येऊन जवळपास 4 कोटींची रक्कम लंपास केली आहे. महत्वाचे म्हणजे ते केवळ एसबीआयच्याच एटीएममधून पैसे काढत असत. त्यांची मोठी टोळी असण्य़ाची शक्यता असून त्यांनी 10 कोटींच्यावर पैसे चोरले असण्याची शक्यता आहे. एसबीआयची एटीएम मशीनमध्येच उपकरण लावून क्लोन करता येते असा दावाही त्यांनी केला आहे.