भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईपोलिसांविरोधात "भारतीय दंड संहिता कलम 149, 340, 341, 342 अंतर्गत चुकीच्या बंदीसाठी" कायदेशीर नोटीस बजावली आहे. मुलुंड येथील नवघर आणि माता रामभाई आंबेडकर (एमआरए) पोलीस ठाण्याला ही नोटीस किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच मुंबईपोलिसांनी २४ तासात माफी मागितली पाहिजे अन्यथा मानवी हक्क आयोग आणि पोलीस कम्प्लेंट अथॉरिटीकडे याचिका दाखल करणार असल्याचा पवित्रा सोमय्या यांनी घेतला आहे.
अनंत चतुर्दशीदिवशी मुंबई पोलिसांनी आपली ताकद वापरून चुकीच्या पद्धतीने मला गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडू दिले नाही. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी होता, परंतु मुंबई पोलिसांनी मला बेकायदेशीरपणे माझ्या निवास आणि कार्यालयातून बाहेर पडण्यासाठी आणि CSMT स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी, ट्रेन पकडण्यासाठी मला रोखले. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या बेकायदेशीर कृत्याबद्दल मी कायदेशीर नोटीस बजावत असल्याचे किरीट सोमय्या यांनी माहिती दिली.