औरंगाबाद : वैद्यकीय शाखेची कोणतीही पदवी नसताना भालगांव (ता. औरंगाबाद) येथे आठ वर्षापासून बिनधास्तपणे दवाखाना चालविणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांचा मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने पर्दाफाश केला. दोन्ही डॉक्टरांच्या ताब्यातून अॅलोपॅथी औषधांचा मोठा साठा, स्टेथस्कोप, बीपी आॅपरेटर मशीन आणि थर्मामिटर ही उपकरणे जप्त केली.
बिपलास तुलसी हलदार (३०, ह.मु. भालगाव, मूळ रा. अंगरेली कॉलनी, बनगाव, जि. २४ परगणा, पश्चिम बंगाल) आणि बिस्वजीत कालीपाद बिस्वास (३१, रा.छाईगडिया, ता.बनगाव, जि. २४ परगणा, प. बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत. पोलसांनी सांगितले की, आरोपी बिपलासकडे कला शाखेची पदवी आहे तर आरोपी बिस्वजीत हा केवळ दहावी शिकलेला आहे. असे असताना दोन्ही आरोपी आठ वर्षांपासून भालगांव येथे दवाखाना चालवित होते.
याची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत भास्करराव दाते यांना सोबत घेऊन मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीच्या मुकुंदवाडी आणि भालगाव येथील घर आणि दवाखान्यावर छापा मारला. त्यावेळी दोन्ही आरोपींकडे त्यांच्या वैद्यकीय पदवी शिक्षणाच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांनी अशाप्रकारचे शिक्षण घेतलेच नसल्याची कबुली दिली. शिवाय त्यांच्या बॅगमध्ये विविध कंपन्यांची अॅलोपॅथीची गोळ्या औषधी, इंजेक्शने मिळाली.
रुग्णांची तपासणी करण्यासाठी वापरला जाणारा स्टेथस्कोप, रक्तदाब तपासणी यंत्र, तापमापक आदी उपकरणे मिळाली. औषधी आणि उपकरणाचा पंचनामा करून पोलिसांनी ती ताब्यात घेतली. आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक उपनिरीक्षक हारूण शेख यांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे सहायक निरीक्षक हारूण शेख, कौतिक गोरे, अस्लम शेख विजय चौधरी, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनील पवार यांनी केली.