देशात रॅगिंगबाबत कडक कायदे करण्यात आले आहेत, मात्र तरीही अनेकदा रँगिंगचे धक्कादायक प्रकार घडत असतात. काही दिवसांपूर्वी तेलंगणामध्ये रॅगिंगच्या नावाखाली एका मुलाला बेदम मारहाण करण्यात आली होती, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. ताजे प्रकरण आसाममधून समोर आले आहे, जिथे वाणिज्य शाखेच्या एका विद्यार्थ्याचा इतका छळ झाला की त्याने कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. दिब्रुगड विद्यापीठातील पाच विद्यार्थ्यांना रॅगिंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
आनंद सरमा या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्याने सीनिअर विद्यार्थ्यांच्या छळाला कंटाळून विद्यापीठ वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दिब्रुगड पोलिसांनी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आणि एका माजी आणि चार वर्तमान विद्यार्थ्यांना अटक केली. या प्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगला नाही म्हणण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीमुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर लिहिले की, रॅगिंगच्या कथित प्रकरणात दिब्रुगड विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणावर मी बारीक लक्ष ठेवून आहे. जिल्हा प्रशासनासह दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पीडित विद्यार्थ्याला वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. रॅगिंगमध्ये सहभागी होऊ नका, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.