तब्बल 45 मिनिटे सुरू होता चोर पोलिसाचा खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 05:15 PM2018-07-28T17:15:57+5:302018-07-28T17:16:46+5:30
सोने तस्करीप्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक
मुंबई - मुंबईतील काँग्रेसच्या एका अधिकाऱ्याला डीआरआयने ( महसूल गुप्तचर संचालनालय) सोने तस्करीप्रकरणी अटक केली आहे. मोहम्मद जामदार असे या आरोपीचे नाव आहे. वांद्रे - वरळी सीलिंक ते सीएसटीदरम्यान पाठलाग करून जामदारला अटक केली आहे. सोने तस्करीसाठी गरीबांचा वापर केल्याचे तपासात पुढे आले आहे.
दक्षिण मुंबईत राहणारा मोहम्मद जामदार हा काँग्रेस पक्षाचा जिल्हा सचिव आहॆ. पक्षाच्या पदाचा चांगला वापर करण्याचे ठरवले होतं. त्यानुसार 2015 पासूनच परिसरातील गरिबांना हाताशी धरून त्याने दुबईतून सोने तस्करी सुरू केली. या तस्करीतून तो गरीबांना मोबदला द्यायचा. कुणाला हज याञेसाठी पाठवून तर कुणाला नोकरीसाठी पाठवायचा. दुबईत गेल्यानंतर त्यांच्या माणसांना भेटायला जायचे सांगून ते या गरीब प्रवाशांकडे सोने पाठवून द्यायचे. फेब्रुवारीत डीआरआयने या तस्करीप्रकरणी एका महिलेला अटक केली. तिच्या चैाकशीतून मोहम्मदचे नाव पुढे आले.
शुक्रवारी मोहम्मदला पकडण्यासाठी डीआरआयचे अधिकारी गेले. त्यावेळी मर्सिडीज कारमध्ये बसून मोहम्मदने पळ काढला. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना त्याचा पाठलाग सुरू केला. वांद्रे वरळी सीलिंक येथून डीआरआयचे अधिकारी त्याच्या गाडीचा पाठलाग करत होते. सीएसटी येथे वाहतूक कोंडीत मोहम्मदची गाडी अडकल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तब्बल 45 मिनिटे हा चोर पोलिसाचा खेळ सुरू होता.