अमरावती: पोलिसांनी अमरावतीमधून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या चोरट्यानं अनेक व्यवसायिकांच्या घरात चोरी करून लाखो रुपये घेऊन लंपास केले होते. जयंतीलाल उर्फ कमलेश खेतमाल ओसवाल असं अटक करण्यात आलेल्या चोराचं नाव आहे. तो मूळचा सूरतचा रहिवासी आहे. सिटी लाईट परिसरात वास्तव्यास असलेल्या राधेशाम गर्ग यांच्याकडे घरफोडी करून फरार झालेल्या ओसवालचा अनेक दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर अमरावतीत त्याला अटक झाली.२० ऑक्टोबरला गर्ग यांच्या घरातून ६ लाख रुपये घेऊन पसार झालेला ओसवाल राज्य परिवहनच्या बसनं वापीला पोहोचला. त्यानंतर त्यानं नंदूरबार आणि मग अमरावती गाठलं. विशेष म्हणजे त्यानं चोरी केलेली रक्कम वापीतल्या दोन बँक खात्यांमध्ये ठेवली. मूळव्याधावरील उपचारांसाठी त्यानं १.४४ लाख रुपये स्वत:कडे ठेवले. इलेक्ट्रॉनिक सर्विलान्सच्या मदतीनं ओसवालला अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेतल्या पोलिसांनी दिली. सहज पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून ओसवाल चोरी करत होता, असंदेखील त्यांनी सांगितलं. राधेशाम गर्ग यांच्या आधी ओसवालनं नऊ जणांच्या घरी चोरी केली होती. त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. कपाटात लपवून ठेवलेल्या लॉकरच्या चावीच्या मदतीनं चोरी करून ओसवालनं रोकड लांबवली. मात्र त्यानं दागिन्यांना हात लावला नाही.याआधी ओसवालला चोरी प्रकरणी अनेकदा अटक झाली आहे. ओसवाल प्रत्येक चोरीनंतर मंदिरात जाऊन देवाकडे आपण केलेल्या पापाबद्दल माफी मागायचा. तो अहमदाबाद आणि अन्य ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये अनेकदा जायचा. ओसवाल आधी कोट्यधीश व्यापारी, व्यवसायिकांच्या चालकांशी संपर्क साधून त्यांच्याशी मैत्री करायचा. त्यानंतर त्यांच्याकडे नोकसीसाठी विचारणा करायचा. मितभाषी स्वभावामुळे त्याला बऱ्याचदा नोकरी मिळायची. त्यानंतर योग्य संधी मिळताच तो घरफोडी करून पसार व्हायचा. लॉकडाऊन काळात नोकरी नसल्यानं ओसवाल एका उड्डाणपुलाखाली वास्तव्यास होता. त्यावेळी त्यानं भीक मागून उदरनिर्वाह केला.
आधी घरफोडी, मग मंदिरात जाऊन देवाची माफी; अखेर 'तो' चोर पोलिसांच्या जाळ्यात
By कुणाल गवाणकर | Published: November 05, 2020 2:48 PM