बिजनौर – उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे अजब गजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका चोराने त्याच्या साथीदारासह घरात चोरी केली. चोरीनंतर त्या दोघांच्या वाट्याला आलेली रक्कम ज्याचा कधीही चोरांनी विचार केला नव्हता. एकदम लाखो रुपये पहिल्यांदाच बघितल्याने एका चोराला हार्ट अटॅक आला, तेव्हा चोरी केलेल्या रक्कमेतून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करावे लागले.
ही घटना तेव्हा उघड झाली जेव्हा कोतवाली परिसरात मागील महिन्यात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात दोन चोरांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली. बिजनौर पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह म्हणाले की, १६ आणि १७ फेब्रुवारीला रात्री दोन चोर नवाब हैदर पब्लिक सर्व्हिंस सेंटरमध्ये घुसले होते, त्यांनी आतमध्ये चोरी केली. हैदर यांनी ७ लाखांपेक्षा जास्त चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
तपास करणाऱ्या पोलिसांना बुधवारी नगीना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीपूर येथून ३० वर्षीय दोन आरोपी नौशाद आणि एजाज सापडले, त्यांना अटक करण्यात आली. दोघांची कसून चौकशी केली. एसपी यांनी सांगितले की, हे एका तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपी एका रेस्टॉरंटमध्ये आढळले, आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हैदर पब्लिक सर्व्हिस सेंटरमधील चोरीची या आरोपींनी कबुली दिली.
चोरीच्या वेळी केवळ १-२ हजार रुपये सापडतील अशी अपेक्षा चोरांना होती, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने ते खूप आनंदी होते, त्या दोघांनी चोरीची रक्कम आपापसांत वाटून घेतली. ही रक्कम पाहून एजाजला ह्दयविकाराचा झटका आला, त्यानंतर तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. एजाजच्या रक्कमेचा मोठा हिस्सा उपचारासाठी खर्च झाला. तर नौशादने दिल्ली येथे सट्टेबाजीत त्याचे पैसे खर्च केले. पोलिसांनी आरोपींकडून ३ लाख ७० हजार तसेच एक पिस्तुल जप्त केली. चोरांकडे एक बाईकही सापडली, जी फुलसंडा गावातून चोरी केली होती. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पथकाला पोलीस अधीक्षकांनी ५ हजार रुपये बक्षीस जाहीर केले.