पिंपरी : जवळपास दररोज विविध ठिकाणी लावलेली वाहने चोरीस जाण्याच्या घटनांची नोंद होत आहे. तसेच हातातील मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकार घडत आहेत. शहरात आणखी सात दुचाकी आणि तीन मोबाईल हिसकावण्याच्या घटना घडल्या.
तुकाराम चिंतामण बालखंडे (वय ३०, रा. खराबवडी चाकण) यांची दुचाकी राहत्या घराजवळून चोरीस गेली. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धावडे वस्ती भोसरीतील भाजी मंडई येथे लावलेले वाहन चोरीस गेल्याची तक्रार मुनीर अहमद इलाहीबक्ष शेख याने भोसरी पोलीस चौकीत दिली आहे. निगडी उड्डाण पुलाखाली लावलेली दीड लाख रुपयांची बुलेट चोरीस गेल्याची तक्रार शैलेश श्यामसुंदर पापत (वय ४९, रा. वसंत विहार, झेंडे चौक चिखली) यांनी दिली आहे. सचिन काळभोर (वय २७, गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी, दळवी नगर निगडी) यांची दुचाकी राहत्या घराजवळून चोरीस गेली. चांदणी चौकाजवळील बंद पेट्रोल पंपाजवळ लावलेले वाहन चोरुन नेल्याप्रकारणी राजू लक्ष्मण शेंडगे (वय ३२, रा. दत्तकृपा गणेशनगर, पिरंगुट) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास सुखदेव व्हरगर (वय २९, रा. माऊली बिल्डींग अभंग इंग्लिश मिडीयम स्कुल देहू रोड) यांची दुचाकी राहत्या घरापासून चोरीस गेली. पोलॅरीज हॉस्पिटल समोरील सार्वजनिक रस्त्यावरून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद गोविंद लक्ष्मण कळसे (वय २२, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे.
रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी फोन हिसकवून धूम ठोकली. ही घटना देहू-चिखली रस्त्यावरील अभंग विश्व सोसायटी सामोर रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. गणेश अशोक धायरकर (वय ३८, धायरकर कॉम्प्लेक्स, जाधववाडी चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरील चोरट्यानी मोबाईल हिसकावल्याची तक्रार सारंग विनोदभाई गज्जर (वय २७, शिवतेज नगर, चिंचवड) यांनी दिली आहे. शाहूनगर चिंचवड येथील काका हलवाई दुकानासमोर रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मकरंद रामधारी यादव (वय २३) यांचाही मोबाईल पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी हिसकावून नेला. महात्मा फुले नगर पवना इंडस्ट्री समोर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. या दोन्ही गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.