मुंबई: घरात बचतीसाठी ठेवलेली पिगी बँक अर्थात बचतीचा डबा चोराने पळवून नेला. हा प्रकार जोगेश्वरी पश्चिम परिसरात उघडकिस आल्या नंतर २२ वर्षीय विद्यार्थिनीने याविरोधात ओशिवरा पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे.
तक्रारदार विद्यार्थिनी सोनी महातो (२२) ही बहरामबाग परिसरात आई-वडील आणि भाऊ-बहिणींसह राहते. तिचे वडील मोटर मेकॅनिक असून आई गृह उद्योग करत संसाराला हातभार लावते. सोनीच्या तक्रारीनुसार तिची आई चिंतादेवी या रोजच्या गृह उद्योगातून मिळणाऱ्या रकमेतून काही पैसे बचत करत ते सदर पिगीबँकमध्ये टाकत होत्या. दरम्यान १ मे रोजी रात्री ८ वाजता हे कुटुंब बिहार या गावी निघाले होते.
तेव्हा पैशाची गरज असल्याने त्यांनी सदर डबा शोधायला सुरुवात केली ज्यात जवळपास ४० हजार रुपये जमा असल्याचा महातो कुटुंबाचा दावा आहे. मात्र तो डब्बा त्यांना कुठेच सापडला नाही तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अनोळखी व्यक्तीने तो डबा पळवून नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त करत पोलिसात धाव घेतली. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.