नालासोपारा - मुंबईत राहणारा ३० वर्षीय तरुण, त्याची पत्नी व सासू विरारमध्ये नातेवाइकांकडे आले असता बुधवारी रात्री घरी जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात ट्रेनचे तिकीट काढताना चोरट्याने त्याचे पाकीट चोरले. तरुणाने चोरट्याचा पाठलाग करून स्टेशनजवळील श्रेया हॉटेलच्या गल्लीत त्याला पकडल्यावर तरुणात व चोरट्यात झटापट झाली. याच झटापटीत चोरट्याने धारदार चाकू तरुणाच्या पोटात खुपसला. जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. विरार पोलिसांनी जबरी चोरी, हत्येचा गुन्हा दाखल केला असून, तपास करत आहेत.
मुंबईच्या विलेपार्ले येथे राहणारा हर्षल वैद्य (३०), त्याची पत्नी प्रियंका आणि सासू प्रभावती मानकामे (६०) हे तिघे बुधवारी विरार येथे राहणाऱ्या नातेवाइकांकडे नवरात्रीनिमित्ताने आले होते. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई येथील घरी जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकाजवळील पश्चिमेकडील तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी आले. त्याचवेळी एका चोरट्याने हर्षलचे पाकीट चोरून रेल्वे स्थानकाच्या बाहेर पळू लागला. हर्षल व इतर लोकांनी चोरट्याचा पाठलाग केला. स्टेशनजवळील श्रेया हॉटेलच्या शेजारील अरुंद बोळात अंधारात लपून बसलेल्या पाकीटचोराला बाहेर येण्यास सांगितले. पण, तो बाहेर न आल्याने हर्षल त्याला पकडण्यासाठी बोळात घुसला. यावेळी चोर आणि हर्षल यांच्यात झटापट झाली. याच झटापटीत चोरट्याने त्याच्याजवळील धारदार चाकू हर्षलच्या पोटात खुपसून गंभीर दुखापत केली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याची स्थिती नाजूक असल्याने मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पण त्याचा तिथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
“या प्रकरणी जबरी चोरी व हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी प्रदीप त्रिपाठी याला अटक करण्यात आली आहे. हा सराईत पाकीटमार असून रेल्वेमध्ये या आरोपीवर पाकीटमारीचे गुन्हे दाखल आहेत.” - सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे