मुंबई - शहरातील उच्चभ्रू नशेबाजांना मँगो गांजा उपलब्ध करून देणारा मुख्य पुरवठादार अमली पदार्थविरोधी पथकाच्या हाती लागला आहे. त्यामुळे त्या पुरवठादारासाठी काम करणाऱ्या एजंटचे धाबे दणाणले असून थर्टी फस्टच्या तयारीला लागलेल्या नशेबाजांचे पुरते वांदे झाले आहेत.
तानाजी काते (39) असे मँगो गांजाच्या मुख्य पुरवठादाराचं नाव आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या तानाजीसाठी जवळपास 18 एजंट काम करतात. ते एजंट शहरातील उच्चभ्रू नशेबाजांना मँगो गांजा देण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वी अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनीटने परळमध्ये राज ठाकूर रिक्षा चालकाला एक किलो 800 ग्रॅम वजनच्या मँगो गांजाची डिलेव्हरी देण्यासाठी आला असता पकडले होते. तेव्हा मुख्य पुरवठादार तानाजी असून तो डोंबिवलीत राहतो, असे राजने पोलीस चौकशीत सांगितले होते. त्यामुळे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत व त्यांच्या पथकाने तानाजीचे घर गाठले होते. परंतु, कुणकुण लागल्याने तानाजी पसार झाला होता. त्यामुळे चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावून पोलीस माघारी परतले होते. त्यानंतर घाबरलेला तानाजी वरळी युनीटमध्ये हजर झाला. त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.