पुणे : अखिल मंडई मंडळाच्या गणेश मंदिरातील शारदा गणपतीचे दागिने चोरुन नेणार्या चोरट्याला मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून ५ लाख १३ हजा रुपयांचे दागिने व रोख दीड लाख रुपये असा ऐवज जप्त केला आहे. अजय महावीर भुक्तर (वय १९, रा. सिद्धार्थनगर, हिंगोली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
मंडईमधील अखिल मंडई मंडळाच्या गणेश मंदिरातील सभा मंडपाकडे जाणार्या मागील बाजुच्या दरवाजाचा कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला होता. त्यानंतर चोरट्यांनी श्री शारदा गजाननाच्या मुर्तीवरील सुवर्णहार, कंठी, मंगळसुत्र अशी २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. मंदिराचे पुजारी शुक्रवारी सकाळी नित्यपुजेसाठी मंदिरात आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता.
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक लहामगे, अंमलदार चव्हाण, वाडेकर, जाधव, चव्हाण, महाजन, गुजर, खांडेकर हे हद्दीत गस्त घालत असताना धनजी स्ट्रीट नाका येथे शनिवारी सायंकाळी एक जण संशयास्पदरित्या थांबलेला आढळून आला. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ५ लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड आढळून आली. अधिक चौकशी केल्यावर त्याने आपण पुण्यातील गणेश मंदिरात चोरी केल्याची कबुल दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी याची माहिती पुणे पोलिसांना देऊन आरोपीला त्याच्या ताब्यात दिले.
याबाबत पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितले की, हा चोरटा सीसीटीव्हीमध्ये आढळून आला होता. त्यानंतर त्याचा माग काढण्यात आला. तेव्हा तो रेल्वेने मुंबईला गेल्याचे दिसून आले. तो कुर्ला येथील ज्या हॉटेलमध्ये थांबला होता. तेथे पुणे पोलीस पोहचले. त्याने या हॉटेलमध्ये सोने कोठे विकता येईल, याची चौकशी केली होती.
तेव्हा हॉटेलमधील कर्मचार्यांनी त्याला दागिना बाजार हे ठिकाण सांगितले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी या बाजारपेठेतील सर्व सराफ व्यवसायिकांना नोटीस बजावून त्यांना असा कोणी दागिने विकण्यास आल्यास कळविण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. दरम्यान, दागिने विकण्यासाठी आलेला आरोपी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांच्या निदर्शनास आला व त्यांनी त्याला ताब्यात घेतले.