पिंपरी : चोरट्यांनी चिंचवड येथील थरमॅक्स चौकातून बँकेचे एटीएम चोरून नेले होते. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी पाच दिवस अहोरात्र मेहनत घेत या गुन्ह्याची उकल केली. दोन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (वय २०, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर), शे?्या उर्फ श्रीकांत विनोद धोत्रे (वय २३, रा. गाडीतळ हडपसर) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. एटीएम चोरीचा गुन्हा घडल्यानंतर विशेष तपास पथक आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार पोलिसांनी वाहन, वाहन मालक, चोरीचा मार्ग असा विस्तृत तपास सुरू केला.
होळकरवाडी, औताडेफाटा येथून ८ जून रोजी एक पिकअप चोरीला गेले असून त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याच पीकअपचा वापर करून चिंचवड येथील एटीएम मशीन चोरण्यात आले. त्यामुळे पिकअपच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता मालकाने त्यांचे पिक अप वडकी फाटा, सासवड रोड येथे मिळून आल्याचे सांगितले. त्यानंतर, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून तपासाची चक्रे फिरवली. सुमारे ९० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा माग काढला. हडपसर येथील महात्मा फुले नगर भागात सापळा लावून पोलिसांनी आरोपी अजयसिंग, शेऱ्या आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेतले. त्या तिघांनी त्यांच्या आणखी तीन साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच आरोपींनी एटीएम चोरीच्या गुन्ह्यासोबत वाहन चोरी आणि घरफोडीच्या आणखी चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. हे चार गुन्हे लोणी काळभोर आणि सासवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपी अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी हा पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात १० वाहन चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
तपास पथकाला वैयक्तिक ५० हजारांचा रिवॉर्ड आयुक्त बिष्णोई यांनी जाहीर केले. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी रवींद्र गावंडे, प्रमोद लांडे, सोमनाथ बोऱ्हाडे , अमित गायकवाड, महादेव जावळे, सचिन उगले, नितीन खेसे, प्रवीण पाटील, विशाल भोईर, किशोर परदेशी, सचिन मोरे, विजय मोरे, गणेश सावंत, मारूती जायभाये, प्रमोद हिरळकार, आनंद बनसोडे, प्रमोद गर्जे, अंजनराव सोडगिर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
......................................................
नदीतील पाण्यातून काढले एटीएमथरमॅक्स चौक येथील नवमी हॉटेलजवळ बँकेचे एटीएम आहे. ९ जून रोजी पहाटे पाचला चोरटे पिकअप व्हॅनमधून आले. त्यांनी एटीएमला दोरखंड बांधला आणि एटीएम बाहेर ओढून काढले. एटीएम हालल्यामुळे एटीएम सेंटरमधील धोक्याची सूचना देणारा सायरन वाजला. त्यामुळे जवळच असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने दुसऱ्या एकाच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षास याबाबतची माहिती दिली. या एटीएममध्ये सात जून रोजी दहा लाखांची रोकड भरली होती. ९ जून रोजी ५ लाख ७१ हजारांची रोकड शिल्लक होती. चोरलेले एटीएम मांजरी भागात मुळामुठा नदीकिनारी नेऊन कटर, हातोडी व छन्नीने तोडले. त्यातील रोकड चोरट्यांनी वाटून घेतली. त्यानंतर एटीएम नदीमध्ये फेकले. पोलिसांनी नदी पात्रात पाण्यातून एटीएम काढले.
..................................................................
रोकडसह साडेसात लाखांचा ऐवज जप्तपोलिसांनी आरोपींकडून सात लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये महिंद्रा पिकअप तीन लाख रुपये, एटीएम मशीन साडेतीन लाख रुपये, रोख रक्कम एक लाख ४० रुपये, एटीएम ओढण्यासाठी वापरलेला लोखंडी वायर रोप, इलेक्ट्रीक केबल तसेच एटीएम कापण्यासाठी वापरलेले कटर १८ हजार रुपये, लोखंडी खंजीर एक हजार रुपये, हिरो होन्डा पॅशन मोटार सायकल ४० हजार रुपये आदींचा समावेश आहे.