लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :--एसबीआय बॅंकेेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याची घटना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर गेले. मात्र तेथील चोरटे त्यापूर्वीच पसार झाले आहे. सदर घटना गोरेगाव येथील कंट्रोल रूममधील सीसीटीव्हीमध्ये दिसत असताना तेथील सुपर वायझरने कळवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
वसईच्या गोलानी नाका येथील दीप टॉवर इमारतीत शॉप नंबर १३ मध्ये एसबीआय बॅंकेचे एटीएम केंद्र आहे. रात्रीच्या वेळी या एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास काही चोर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत कंट्रोल रुमला स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर वालीव आणि नायगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळावर रवाना झाले. पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच चोर पसार झाला. चोरांनी एटीएमचे शटर बाहेरून बंद करून कटरच्या सहाय्याने एटीएम फोडत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मास्क लावलेला एक चोर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात दिसत आहे. पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत.