कोटा - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. पश्चिम-मध्य रेल्वेच्या कोटा रेल्वे विभागात शनिवारी रेल्वेची ओव्हरहेड वायर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोटा विभागातील नव्याने उभारलेल्या रामगंजमंडी-भोपाळ रेल्वे मार्गावर ही घटना घडली. रेल्वे मार्गावरील झालरापाटन-जुनाखेडा स्थानकांदरम्यानची 25 हजार व्होल्टेजची ओव्हरहेड वायर चोरट्यांनी स्मार्ट पद्धतीने कापून लंपास केली आहे. चोरीला गेलेल्या वायरची किंमत जवळपास 10 लाख रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
पश्चिम-मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त प्रदीप कुमार गुप्ता यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ते स्वतः कोटा येथे गेले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणात रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चोरीला गेलेल्या ओव्हरहेड वायरची किंमत 10 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
जवळपास एक किलोमीटरच्या परिसरातील ओव्हरहेड वायर चोरट्यांनी कापली आहे. या प्रकरणी रामगंजमंडी रेल्वे पोलिसांत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपास केला जात आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अजय कुमार पाल यांनी या ओव्हरहेड वायरची किंमत प्रतिमीटर 300 ते 350 रुपये आहे असं म्हटलं आहे. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी रामगंजमंडी रेल्वे पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, कोटा रेल्वे मंडल आणि पश्चिम-मध्य रेल्वेच्या जबलपूर मुख्यालयात खळबळ माजली.
पश्चिम-मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त प्रदीप कुमार गुप्ता हे स्वतः आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. कोटा रेल्वे मंडलाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त विजय प्रकाश यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. तसेच तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. विद्युत प्रवाह सुरू असताना, चोरट्यांनी वायर कापून लंपास केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.