उत्तर प्रदेशातील देवरिया येथे महर्षी देवरा बाबा मेडिकल कॉलेजच्या पीआयसीयू वॉर्डमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारा पाईप चोरट्यांनी कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी ऑक्सिजन पाईप कापून भंगारात विकला. ही बाब उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे दाखल झालेल्या मुलांचा जीव धोक्यात आला. अशा स्थितीत तातडीने सिलिंडर बसवून ऑक्सिजन सप्लाय सुरू करण्यात आला.
ऑक्सिजन पाईप चोरीची ही घटना पीआयसीयू वॉर्डात ऑक्सिजन पुरवठा होत असतानाच उघडकीस आली. त्यानंतर वॉर्डात ठेवलेले ऑक्सिजन सिलिंडर लावून मुलांना तातडीने ऑक्सिजन पुरविण्यात आला. पीआयसीयू वॉर्डच्या मागे गेल्यावर ऑक्सिजनच्या कमतरतेचं कारण समजलं, पाईप कापलेले आढळले. हे पाहून प्रशासन हादरलं. पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
मेडिकल कॉलेजच्या पीआयसीयू वॉर्डच्या मागे एक तरुण पुन्हा दुसरी चोरी करण्यासाठी पोहोचला. मात्र रुग्णालयात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. चौकशीनंतर त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलीप कुमार सिंह यांनी सांगितलं की, मोहम्मद परवेज आणि सुमित कुमार उर्फ बुलेट या दोघांना अटक करण्यात आली आहे. ते भटवालिया येथील रहिवासी असून त्यांचं वय १९ ते २० वर्षे आहे. हे दोघेही व्यसनी आहेत.
डॉ.एच. के. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीआयसीयू वॉर्डमधून पाईप कापून चोरी झाली होती. हा क्रम असाच चालू होता. याच दरम्यान, गेल्या शनिवारी रात्री एक संशयित तरुण दिसल्यावर त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं. पाईप हा कॉपरने बनलेला आहे, त्यामुळे तो महाग आहे. विकल्यावर त्याची जास्त किंमत मिळते.