मुंबई - मुंबईसह आसपासच्या शहरांतून दुचाकी चोरून मिळेल त्या भावात विकणाऱ्या दोन सराईत दुचाकी चोरांचा शिवडी पोलिसांनी पर्दापाश केला आहे. मेहराज अब्दुलबारी शेख (१९) आणि मुस्ताक लालबाबू मन्सुरी (२०) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी चोरीच्या २६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मात्र, इतक्या गाड्या चोरल्या आहेत की आठवत नाही बाकीच्या कुठे उभ्या केल्या असल्याचे दोघे पोलिसांना सांगतात. मागील चार वर्षांपासून हे दोघे दुचाकी चोरत असल्याची कबूली त्यांनी दिली आहे.
दुचाकी चोरांची सध्या ऍक्टिव्ह दुचाकी गाडी चोरण्यास मोठी पसंती आहे. ही गाडी चोरण्यासाठी सोपी असल्यामुळे आणि या गाड्यांना मोठी मागणी असल्यामुळे चोरी करत असल्याचे आरोपींच्या चौकशीतून पुढे आले आहे. मेहराज आणि मुस्ताक हे दोघेही मानखुर्द परिसरात राहणारे असून अल्पवयीन असल्यापासूनच त्यांनी दुचाकी चोरण्यास सुरूवात केली. प्रत्येक गाडी मागे त्यांचे दहा हजार रुपये सुटत. गर्दीतल्या दुचाकी अगदी तिसऱ्या मिनिटाला दोघेही चोरायचे. चोरीची गाडी पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून ती गाडी पालिकेच्या पे अँड पार्कमध्ये नेवून उभे करायचे. या चौघांच्या चौकशीतून पोलिसांनी आतापर्यंत २६ चोरीच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत. विशेष या दोघांनी चोरलेल्या अनेक गाड्या त्यांनी कुठे उभ्या केल्या आहेत. याची ही त्यांना माहिती नाही. दरम्यान, नुकतीच या दोघांनी यलोगेट परिसरात एक ऍक्टिव्हा चोरली होती. या गुन्ह्याचा तपास शिवडी पोलिसांनी करण्यास सुरूवात केल्यानंतर सीसीटिव्हीच्या मदतीने या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबूली देत. आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याची कबूली दिली. चोरलेली दुचाकी गॅरेज किंवा बनावट कागदपत्र बनवणाऱ्यांना देऊन मोबदला म्हणून दहा हजार रुपये घेतल्याचे पोलिसांना सांगितले. या दोघांनी अन्य काही ठिकाणी दुचाकी चोरून विकल्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे चोरलेल्या दुचाकींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.