विलास जळकोटकर
सोलापूर : गर्दीच्या ठिकाणाचा गैरफायदा उठवीत चोरट्याकडून बेमालूमपणे हातसफाईचा आपला धंदा जोरात सुरू ठेवला आहे. सोलापूरच्या बसस्टँडवरून चोरट्यानं चक्क महिला पोलिसाच्या पर्समधून दोन तोळ्यांचा राणीहार आणि रोकड असा ५३ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. सायंकाळचीगर्दीची वेळ साधून चोरटंयाने ही संधी साधली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा नोंदला आहे.
याप्रकरणी महिला पोलिस हवालदार सविता विजयकुमार क्षीरसागर (केशवनगर, पोलिस लाइन, सोलापूर) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदला आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, मोहोळ येथे नातलगाच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमानिमित्त मोहोळला जाण्यासाठी सोलापूरच्या बसस्थानकात आल्या होत्या. वेळ साधारण सहा-साडेसहाची होती. प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. दरम्यान, मोहोळकडे जाणारी एसटी बसस्टँडवर आली. त्यावेळी एसटीत चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीत फिर्यादी सविता क्षीरसागर यांच्या पर्सवर डोळा ठेवून चोरट्यानं पर्समधील २१ ग्रॅम वजनाचा राणीहार आणि रोख रक्कम घेऊन चोरटा पळून गेला. ही बाब लक्षात आल्यानंतर क्षीरसागर यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवताच गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस नाईक भद्रशेट्टी करीत आहेत.